नवी दिल्ली : कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात भाजपाने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. अमेठी येथे मतदानादरम्यान राहुल गांधी यांनी ईव्हीएमजवळ जाऊन आचारसंहितेच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आला. यासंदर्भात कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणीदेखील भाजपाकडून करण्यात आली आहे. बुधवारी मतदानादरम्यान अमेठी येथील तिलोई विधानसभा क्षेत्रातील तीन मतदार केंद्रांवर प्रवेश केल्यानंतर राहुल गांधी ‘ईव्हीएम’जवळ गेले होते. यावर आक्षेप घेत भाजपाचे वरिष्ठ नेता वेंकय्या नायडूनीयांनी पक्षाच्या शिष्टमंडळासोबत आयोगाच्या अधिकार्यांची भेट घेतली व याबद्दल तक्रार केली. नियमांनुसार केवळ मतदार, पीठासीन अधिकारी व मतदान अधिकारी हेच ‘ईव्हीएम’जवळ जाऊ शकतात.उमेदवाराला ‘ईव्हीएम’जवळ जाण्याची परवानगी नसल्याचा दावा भाजपाने केला आहे. अमेठीतून निवडणूक लढवत असलेले काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी कधी नव्हे त बुधवारी झालेल्या मतदानादरम्यान आपल्या मतदारसंघात हजर होते़ पण याचदरम्यान आयोगाचे निर्देश पायदळी तुडवताना त्यांना पाहिले गेले़ मतदान सुरू असताना तीन मतदान केंद्रांवर ते ईव्हीएमजवळ (मतदान यंत्र) उभे असल्याची छायाचित्रे जारी झाल्यानंतर खळबळ उडाली़ यापैकी दोन मतदार केंद्रांवर ते मतदान यंत्राजवळ उभे असलेले दिसतात़ तिसर्या मतदान केंद्रावर मतदान यंत्रापासून दूर जाताना दिसतात़ दिल्लीतील निवडणूक आयोगाच्या एका वरिष्ठ अधिकार्याने उमेदवाराने अशाप्रकारे मतदान यंत्राजवळ जाणे नियमबाह्य असल्याचे म्हटले आहे़ जर उमेदवार मतदान यंत्राजवळ जात असेल तर निवडणूक निर्णय अधिकारी त्याला जबाबदार असेल़ मतदार मतदानाचा हक्क बजावताना उमेदवार मतदान यंत्राजवळ जाऊन हस्तक्षेप करीत असेल तर ते लोकप्रतिनिधी कायद्याचे उल्लंघन असल्याचे हा अधिकारी म्हणाला़ ‘आप’चादेखील आक्षेप राहुल गांधी मतदान केंद्रात आतपर्यंत शिरून मतदारांशी बोलत असल्याची अनेक छायाचित्रे सोशल नेटवर्किंग साईटवर टाकून आम आदमी पार्टीनेही यासंदर्भात आक्षेप नोंदवला आह़े मतदान यंत्राजवळ राहुल उभे असतानाचे एक छायाचित्र अपलोड करून, ‘उमेदवाराला मतदान यंत्राजवळ जाण्याचा अधिकार आहे का?’ असा सवाल आम आदमी पार्टीने निवडणूक आयोगास केला होता़ नियमानुसार मतदान सुरू होण्यापूर्वी सकाळी ५ ते ७ या वेळात मतदान कसे करायचे किंवा मतदान यंत्रात बिघाड आहे का? यासाठीचे ‘मॉक ड्रिल’ केले जाते़ यावेळी उमेदवार किंवा संबंधित पक्षाचा एजंट मतदान यंत्राजवळ जाऊ शकतो़ राहुल गांधी सकाळी ७.३० वाजता अमेठीतील फुरसतगंज विमानतळावर उतरले होते़ त्यामुळे राहुल गांधी मतदानादरम्यान मतदान यंत्राजवळ काय करीत होते? याचे उत्तर निवडणूक अधिकार्यांना द्यावे लागणार आहे़
राहुल गांधींविरोधात भाजपाची तक्रार
By admin | Published: May 09, 2014 1:19 AM