मुंबई : निवडणुकीच्या काळात राजकीय वातावरण तापत आहे. सोशल मीडियावरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना ही मंडळी खालची पातळी गाठत आहेत. अशात शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्याने फेसबुक अकाउंटवर मुख्यमंत्र्यांविरुद्ध अपशब्द वापरून एक पोस्ट शेअर केली. या प्रकरणी भाजपाच्या सोशल मीडिया सेलने सायबर सेलकडे लेखी तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून सायबर सेल अधिक तपास करत आहे.भाजपाच्या सोशल मीडिया सेलप्रमुख देवांग दवे यांनी बीकेसी येथील सायबर सेलकडे लेखी अर्ज दिला आहे. तक्रार अर्जात दिलेल्या तक्रारीनुसार, शिवसेनेच्या आशा सावरकर-रसाळ यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाचा एक फोटो पोस्ट केला. त्याखाली अपशब्द वापरले. शेअर केलेल्या पोस्टला आणखीन काही जणांनी कमेंट दिल्या आहेत. कुठे तरी मुख्यमंत्र्यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न त्यांनी त्यांच्या तक्रार अर्जात केला आहे. या प्रकरणी सायबर सेल अधिक तपास करत आहे. तपासात सोमवारी सायंकाळच्या सुमारास ही पोस्ट २१ वेळा शेअर करण्यात आली. त्याखाली तब्बल १२१ कमेंट्सचा समावेश आहे. यामध्ये पहिली पोस्ट शेअर करणाऱ्या आशा या कल्याणच्या रहिवासी असून त्या सेनेच्या उपशाखाप्रमुखपदी आहेत. या घटनेवरून येत्या काही दिवसांत राजकीय वातावरण तापणार असल्याचे दिसून येत आहे. (प्रतिनिधी)
शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्याविरुद्ध भाजपाची तक्रार
By admin | Published: February 15, 2017 3:34 AM