मुंबई : देशात महाराष्ट्रामुळे परिवर्तनाची लाट आली. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सरकार स्थापन करण्याचा निर्णय महाराष्ट्राच्याच हिताचा नाही तर देशाच्या हिताचा आहे. महाराष्ट्र हे प्रगत राज्य आहे. भाजपाला मुख्यमंत्री लादता आला नाही. जनतेत रोष होता आणि पलटवार केला, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे उद्या सायंकाळी 6.40 वाजता शपथ घेणार आहेत. आज आमदारांचे शपथविधी होत आहेत. शिवसेनेचे सरकार बनल्यामुळे महाराष्ट्राने देशाला नवीन सकाळ दाखविली. शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र ना झुकनार ना तुटणार, दिल्लीला झुकवणार असा इशारा राऊत यांनी दिला. याचबरोबर भाजपावर गंभीर आरोप केले.
भाजपाला मुख्यमंत्री लादता आला नाही. भाजपाने शिवसेनेच्या हाती सत्ता येऊ नये यासाठी अघोरी प्रयोग केले. काहीही करा पण सत्ता हाती लागू देऊ नका, असे प्रयत्न केले. तरीही काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेते एकत्र आले, असा आरोप करताना राऊत यांनी 'निवृत्ती'च जाहीर केली.
मी तुमच्याशी उद्यापासून बोलणार नाही. माझी जबाबदारी कमी झाली. मला मोहिम दिली गेली होती. आमचे सूर्ययान मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर सुरक्षित उतरणार आहे. तेव्हा मला हसले होते. आम्ही उतरवून दाखवलेय. आता हे यान पुढे दिल्लीतही उतरले तर आश्चर्य वाटून घेऊ नका, असा इशाराच त्यांनी भाजपाला दिला आहे. तसेच पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनाही मी जबाबदारीतून बाहेर पडत असल्याचे म्हटले आहे. तसेच काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखिल आपल्याला इथे आता काही काम उरले नाही, आपल्याला दिल्लीला जावे लागेल, असे सांगितल्याचे राऊत म्हणाले.