‘जलयुक्त शिवार योजने’वरून भाजपा, काँग्रेसमध्ये जुंपली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2018 05:16 AM2018-11-22T05:16:50+5:302018-11-22T05:17:35+5:30
जलयुक्त शिवार योजना राबवूनही नोव्हेंबर महिन्यात राज्यात टँकरच्या संख्येत झालेली वाढ चक्रावून टाकणारी आहे. यामुळे या योजनेचे पितळ उघडे पडल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते आणि सरचिटणीस सचिन सावंत यांनी केला.
मुंबई : जलयुक्त शिवार योजना राबवूनही नोव्हेंबर महिन्यात राज्यात टँकरच्या संख्येत झालेली वाढ चक्रावून टाकणारी आहे. यामुळे या योजनेचे पितळ उघडे पडल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते आणि सरचिटणीस सचिन सावंत यांनी केला. त्यावर भाजपाकडून तत्काळ खुलासा करण्यात आला. सावंत यांनी मे अखेरची आकडेवारी घेतली असती, तर त्यांच्याच सरकारचे पितळ उघडे पडले असते, असा टोला भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी लगावला. त्यावर मे २०१८ मध्ये १,६२२ टँकर लावल्याची आकडेवारी सावंत यांनी बुधवारी जाहीर केली.
भाजपाच्या अकार्यक्षम, भ्रष्टाचारी कारभारावर बोट ठेवल्यामुळे भाजपाचे प्रवक्ते खोटे आकडे देत आहेत. नोव्हेंबर महिन्यातील आकडेवारी दाखविता येत नाही, हे पाहून मे महिन्यातील आकडेवारी दाखविण्याचा अयशस्वी प्रयत्न केला जात आहे, असा आरोप सावंत यांनी केला.
२०१३ मध्ये १०९ टक्के पाऊस पडून २,३२२ टँकर, तर २०१४ मध्ये ७० टक्के पावसात २,३५८ टँकर होते. टँकर लॉबी काँग्रसने पोसली होती, असा आरोप करून केशव उपाध्ये म्हणाले, युती सरकारच्या काळात मे २०१६च्या अखेरीस ९५ टक्के पाऊस पडूनही १,३४३ टँकर होते. त्यावर सावंत यांनी ३० मे २०१६ रोजी राज्यात ५,९२३ टँकर चालू असल्याची आकडेवारी सरकारच्याच संकेतस्थळावर असल्याचे दाखवून दिले. भाजपाने खरी आकडेवारी दिली असती, तर आमचे समाधान झाले असते. मात्र, भाजपाच्या खुलाशातून खोटेपणा आणि प्रवक्त्यांचे अज्ञान दिसून येते, असे काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले.