भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी बाजुला; मनसेच्या रडारवर पुन्हा शिवसेनाच
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 03:30 PM2020-01-22T15:30:09+5:302020-01-22T15:31:55+5:30
काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जावून शिवसेने हिंदुत्वाचा त्याग केल्याची टीका होत असताना मनसे हिंदुत्वाचा मुद्दा पुढे रेटणार असं दिसत आहे. त्यामुळे भविष्यात मनसेचा मुख्य शत्रु भाजप, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस नव्हे तर पुन्हा एकदा शिवसेना असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मुंबई - लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधी भूमिका घेत नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर टीका करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे पुन्हा एकदा आक्रमक भूमिकेसह राज्याच्या राजकारणात पुनरागमन करण्यास सज्ज झाले आहेत. मात्र यावेळी त्यांच्या रडारवर भाजपऐवजी पुन्हा एकदा शिवसेनाच दिसत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत असलेल्या टीकेवरून हे स्पष्ट होत आहे.
शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर राज ठाकरे यांनी मनसेची स्थापना केली होती. त्यावेळी शिवसेनेतील अनेक नेते त्यांच्यासोबत आले होते. राज ठाकरे यांनी देखील पहिल्याच निवडणूकीत 14 आमदार विधानसभेत पाठवले. त्यावेळी राज ठाकरे यांनी शिवसेनेवर टीका करतच आपली राजकीय वाटचाल सुरू केली होती. राज यांच्यामुळे शिवसेनेचे देखील नुकसान झाले होते.
आघाडी सरकारच्या काळात राज ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर कडाडून टीका केली होती. मात्र 2014 येईपर्यंत राज ठाकरे यांचा करिष्मा कमी झाला. तर शिवसेना आणि भाजप सत्तेत आले. या काळात राज ठाकरे यांचा शिवसेनेवर राग कमी झालेला दिसून आला. तसेच 2019 येईपर्यंत राज ठाकरे भाजप आणि मोदी-शाह यांचा प्रखर विरोध करू लागले. लोकसभा निवडणुकीत उमेदवार न देता राज ठाकरे यांनी भाजपला शिंगावर घेतले होते. त्यावेळी शिवसेनेविषयी ते फारसे बोलतान दिसले नाही.
पोषक आहारासाठी राब राब राबलेल्या कार्यकर्त्यांच्या वाट्याला आली सपक महाखिचडी..
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) January 22, 2020
पण सच्च्या कार्यकर्त्यांनो,बाळासाहेबांच्या कडव्या शिवसैनिकांनो निराश होऊ नका...
निर्लज्जपणे असाच सुरु राहील सत्तेचा खेळ
मनसेचा झेंडा हाती घ्यायची हीच ती वेळ
बाळासाहेबांच्या जयंतीला ‘मन से’ सामील व्हा
दरम्यान विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले आहे. तर राज ठाकरे यांचा एकच आमदार विधानसभेत आहे. आता राज यांनी पुन्हा एकदा पक्ष बांधणीकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. मात्र याआधीच मनसे नेत्यांकडून शिवसेनेला लक्ष्य करण्यात येत आहे. अमेय वाघ, संदीप देशपांडे यांनी शिवसेनेविरुद्ध वक्तव्य करण्यास सुरुवात केली आहे. उद्या मनसेचे अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जावून शिवसेने हिंदुत्वाचा त्याग केल्याची टीका होत असताना मनसे हिंदुत्वाचा मुद्दा पुढे रेटणार असं दिसत आहे. त्यामुळे भविष्यात मनसेचा मुख्य शत्रु भाजप, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस नव्हे तर पुन्हा एकदा शिवसेना असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.