- यदु जोशी, मुंबई
भारतीय जनता पार्टीचे प्रत्येक महापालिकेतील नगरसेवक आणि जिल्हा परिषदांतील सदस्य हे दरवर्षी आपली संपत्ती जाहीर करतील आणि त्यात अवाजवी वाढ झाल्याचे आपल्याला कुठेही दिसणार नाही, अशी ग्वाही भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत दिली. पारदर्शकतेच्या आम्ही नुसत्या गप्पा मारत नाही. संपत्तीचा तपशीलच काय, पण भाजपाची सत्ता असलेल्या महापालिका व जिल्हा परिषदांमधील टेंडरची प्रक्रिया पारदर्शक केली जाईल आणि ती जनतेसाठी खुली केली जाईल, असे खा. दानवे म्हणाले. निवडणुकीच्या प्रचारात केवळ मुख्यमंत्र्यांनाच प्रोजेक्ट केले जातेय. बाकीच्यांना स्थान का नाही? मग यश, अपयशाची जबाबदारी कोणाची ?आम्ही सगळेच प्रचारात आहोत. मुंबईतील जाहिरातींमध्ये, ‘मी शब्द देतो’ असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी मतदारांना आवाहन केले, यात काहीही चूक नाही. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तेच शब्द देऊन त्याची पूर्तताही करू शकतात. यशापयशाचे म्हणाल, तर भाजपात सामूहिक जबाबदारी असते.शिवसेना दरक्षणी पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून भाजपाच्या प्रत्येक नेत्याचा पाणउतारा करीत असतानाही तुम्ही सत्तेसाठी लाचार होऊन त्यांची वाट्टेल ती बोलणी सहन करताय ना?शिवसेनेची पोटदुखी वेगळी आहे. विधानसभा निवडणुकीत आम्हाला १२३ तर त्यांना ६३ जागा मिळाल्या, तेव्हापासून ते अस्वस्थ आहेत. त्यांची नाराजी मतदारांवर आहे, ते ती आमच्यावर काढतात. ‘लेकी बोले सुने लागे’ असा हा प्रकार आहे. मराठा समाजाने फडणवीस सरकारला या निवडणुकीत धडा शिकवावा, असे आवाहन काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी केले आहे. आपली प्रतिक्रिया? राणेंचे त्यांच्या जवळच्यांनीही ऐकले तरी खूप झाले. वर्षभरासाठी मिळालेले मुख्यमंत्रिपद पुन्हा मिळाले नाही, हे त्यांचे शल्य आहे. ‘शिंक्याचं तुटतं का अन् बोक्याचं बनतं का’ अशी वाट ते पाहत आहेत. निवडणुकीच्या राजकारणाशी आमचा संबंध नाही, असे अनेक मराठा संघटनांनी आधीच स्पष्ट केले आहे. आपण आपल्या कन्येला जि.प.ची उमेदवारी दिली. घराणेशाही अन् गुंडशाही भाजपामध्येही घुसली तर? माझी मुलगी आधीच सरपंच आहे. परिसरातील गावांची तिला उमेदवारी देण्याची मागणी होती, म्हणून उमेदवारी दिली. माझ्या तीन मुली तीन राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या घरात दिलेल्या आहेत. गुंडशाहीबाबत आमच्यावर आरोप करणाऱ्यांनी सर्वाधिक गुंड उमेदवार दिल्याचे सगळ्यांनी वाचलेय आता. १२ जि.प.स्वबळावर जिंकू२५ पैकी १२ जिल्हा परिषदांमध्ये भाजपाची स्वबळावर सत्ता येईल, असा दावा दानवे यांनी केला. ते म्हणाले की, इतर काही ठिकाणी आम्ही इतरांच्या पाठिंब्याने सत्ता मिळवू. मुख्यमंत्री, मी, भाजपाचे मंत्री, पदाधिकाऱ्यांपासून कार्यकर्त्यांचे हे यश असेल.