जळगाव : महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या समर्थनार्थ महापालिकेतील १७ नगरसेवकांनी राजीनामा देऊन बंडाची तयारी केली होती. मात्र खडसे यांनीच असे न करण्याचा सल्ला दिल्याने तीन तासांतच हे बंड थंड झाले. महापालिकेतील विरोधी पक्षनेते वामनराव खडके यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या १६ नगरसेवकांची बुधवारी दुपारी अजिंठा विश्रामगृहात बैठक झाली. ३० कोटींचे लाचप्रकरण, कथित दाऊद-खडसे संवाद याप्रकरणी पक्षाने खडसे यांची पाठराखण करावी, यासाठी हे नगरसेवक गुरुवारी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना मुंबईत भेटून पदाचा राजीनामा देणार होते. या घडामोडीनंतर खडसे जळगावात आले व नगरसेवकांनी असे प्रकार करू नयेत, असे त्यांनी सांगितल्यावर बंड अवघ्या तीन तासांत थंड झाले. त्यानंतर मुंबईला जाण्याचा निर्णयही नगरसेवकांनी रद्द केला. (प्रतिनिधी)
भाजपा नगरसेवकांचे बंड तीन तासांत थंड!
By admin | Published: June 02, 2016 2:36 AM