मुंबई - काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात राष्ट्रव्यापी मोहीम उघडली आहे. दक्षिण भारतातून सुरू झालेल्या राहुल गांधींच्या या यात्रेला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, ही यात्रा आता दक्षिण भारतातून महाराष्ट्रात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर या यात्रेवर भाजपाने कडाडून टीका केली आहे.
भारतीय जनता पक्षाने अधिकृत फेसबूक पेजवर एक पोस्ट शेअर करून राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांची 'भारत जोडो' यात्रा महाराष्ट्रात ४ जिल्ह्यातच गुंडळाली जाणार, असा टोला भाजपाने या पोस्टमधून लगावला आहे.
या पोस्टमध्ये भाजपाने राहुल गांधींवर टीका करताना म्हटले आहे की, केरळसारख्या लहानश्या राज्यात तब्बल २० दिवस थांबून राज्यभर दौरा करणाऱ्या राहुल गांधीनी महाराष्ट्रात मात्र 'भारत जोडो' यात्रा फक्त ४ जिल्ह्यातून करायचं ठरवलं आहे. राहुल गांधीना खात्री झाली आहे की, महाराष्ट्रात त्यांच्या भारत जोडो यात्रेला प्रतिसाद मिळणार नाही. त्यामुळे ३६ पैकी फक्त ४ जिल्ह्यात ते 'भारत जोडो' यात्रा करणार आहेत.स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल कायम गरळ ओकणाऱ्या राहुल गांधीना महाराष्ट्रातील जनता नक्कीच अद्दल घडवेल, असा इशाराही भाजपाकडून देण्यात आल आहे.