मुंबई – माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रदीर्घ मुलाखत लवकरच प्रसिद्ध होणार आहे. तत्पूर्वी ठाकरे गटाकडून या मुलाखतीचा पहिला टीझर प्रसिद्ध केला आहे. या मुलाखतीचा पोस्टर सोशल मीडियावर पोस्ट करत खासदार संजय राऊतांनी जोरदार असं कॅप्शन दिले आहे. राऊतांच्या या ट्विटला रिट्विट करत भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना खोचक टोला लगावला आहे.
केशव उपाध्ये यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की, लोकं उत्सुक आहेत, मित्र पक्षाला कसा धोका दिला हे ऐकण्यासाठी, मुख्यमंत्रिपदी असतानाही अडीच वर्ष घरी असल्याची कहाणी ऐकण्यासाठी, विचारधारेला बाजूला टाकून महत्त्वकांक्षेसाठी सत्ता मिळवण्याची गोष्ट ऐकण्यासाठी, कार्यकर्त्यांनी रक्ताचं पाणी करून वाढवलेला पक्ष तुमच्या अहंकारापोटी फुटल्याची कहाणी ऐकण्यासाठी आणि हे सगळे कसं बरोबर आहे हे सांगण्यासाठी संजय राऊतना लिहून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे ऐकण्यासाठी असं टीकास्त्र त्यांनी ठाकरे गटावर सोडले आहे.
ठाकरे गटाकडून आवाज कुणाचा हा शिवसेना पॉडकास्ट चालवला जातो. त्यात पक्षाच्या आमदारांची, नेत्यांची मुलाखत घेतली जाते. यात बुधवारी २६ जुलै आणि गुरुवारी २७ जुलै या दिवशी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत प्रसिद्ध होणार आहे. आवाज महाराष्ट्राच्या कुटुंबप्रमुखांचा असं म्हणत वर्षातील सर्वात मोठी आणि प्रखर मुलाखत असं कॅप्शन या पोस्टरला देण्यात आले आहे. खासदार संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंची ही मुलाखत घेतली असून या मुलाखतीच्या पहिल्या टीझरमध्ये ठाकरे भाजपा आणि शिंदे गटाचा समाचार घेताना दिसत आहेत.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
या देशातील लोकशाही साधा माणूस वाचवणार आहे. बाबरीवेळी तुम्ही जबाबदारी घेतली नाही. राम मंदिराचा निर्णय तुम्ही घेतला नाही. मग राम मंदिराचे श्रेय तुम्ही कसे घेऊ शकता? असा सवाल उद्धव ठाकरेंनी भाजपाला केला आहे. त्याचसोबत देशावर प्रेम करतो, देशासाठी मरायला तयार आहे तो माझ्यासाठी हिंदू, माझा देश माझा परिवार आहे. हे माझे हिंदुत्व आहे. आज माझ्याविरोधात अख्खा भाजपा आहे. तरीही तुम्हाला उद्धव ठाकरेची भीती का वाटते? उद्धव ठाकरे हा एक व्यक्ती नसून उद्धव ठाकरे म्हणजे बाळासाहेबांचा विचार आहे. मला संपवण्यात तुम्हाला आनंद मिळत असेल तर संपवा, मग माझ्या वडिलांचे आशीर्वाद, जनतेची साथसोबत आणि तुमची ताकद बघू असा इशाराच उद्धव ठाकरेंनी भाजपाला दिला आहे.