मुंबई – गेल्या काही दिवसांपासून राज्यात महाविकास आघाडीतील काही आमदार नाराज असल्याच्या बातम्या येत आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनातही शिवसेनेचे काही आमदार बहिष्कार टाकणार असल्याचं समोर आले होते. आता काँग्रेसच्या आमदारांनी थेट पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून महाविकास आघाडीविरुद्ध नाराजी समोर आणली आहे. याच मुद्द्यावरून आता भारतीय जनता पार्टीने महाविकास आघाडीला(Mahavikas Aghadi) चिमटा काढला आहे.
भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये(BJP Keshav Upadhye) यांनी ट्विट करत म्हटलंय की, महाविकास आघाडीत काँग्रेसचे(Congress) २५ आमदार नाराज, शिवसेनेचेही(Shivsena) २५ आमदार नाराज, मग उरलं कोण? आतापर्यंत मविआवर जर कुणी नाराज नसेल तर ती राष्ट्रवादी काँग्रेस(NCP). मुख्यमंत्रिपद असूनही शिवसेना आमदारांना कुणी विचारत नाही. सत्ता नसली तर काँग्रेस टिकणार नाही. त्यामुळे उपमुख्यमंत्री, अर्थ, गृह, गृहनिर्माणसारखी खाती असणाऱ्या राष्ट्रवादीच्या अध्यक्षांनी शिवसेना-काँग्रेसची बाहुली करून ठेवलीय अशा शब्दात त्यांनी काँग्रेस-शिवसेनेची खिल्ली उडवली आहे.
तसेच धरलं तर चावतंय अन् सोडलं तर पळतंय अशी अवस्था सेना-काँग्रेसची झाली आहे. जे स्वत:च्या आमदारांना न्याय देऊ शकत नाहीत ते राज्यातील जनतेचं काय भलं करणार? मुख्यमंत्र्यांचा कारभार भारी चाललाय, माझे कुटुंब (मुलगा, मेव्हुणा) माझी जबाबदारी, बाकी सगळे फिरू दे दारोदारी असं सांगत भाजपाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (CM Uddhav Thackeray) निशाणा साधला आहे.
काँग्रेसच्या नाराज २५ आमदारांचे सोनिया गांधींना पत्र
राज्यातील काँग्रेसच्या २५ आमदारांनी त्यांच्या मनातील खदखद बोलून दाखविण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची वेळ मागितली आहे. कुणाल पाटील, संग्राम थोपटे, प्रणिती शिंदे यांनी या पत्रासाठी पुढाकार घेतला. विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असतानाच या पत्रासाठी सह्यांची मोहीम राबविण्यात आली होती. सूत्रांनी सांगितले की, महामंडळांवरील नियुक्त्या होत नसल्याबद्दल या पत्रात नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. काही जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत साध्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांना संधी देता आलेली नाही, तसेच महाविकास आघाडीचे सरकार राज्यात आले तेव्हा किमान समान कार्यक्रम निश्चित करण्यात आला होता आणि त्यानुसारच हे सरकार चालेल असे निश्चित करण्यात आले होते. याची प्रभावी अंमलबजावणी अद्यापही होत नसल्याचा सूर पत्रात आहे. काँग्रेस पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी काय करता येऊ शकेल याविषयी आम्हाला सूचना मांडायच्या आहेत, असेही या आमदारांनी पत्रात म्हटले आहे.