सिंधुदुर्ग ( सावंतवाडी ): विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्तास्थापनेवरून भाजप-शिवसेना एकमेकांच्या विरोधात गेली होती. मात्र त्यांनतर या दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर आरोप करण्याची कोणतेही संधी सोडत नाही. भाजपचे नेते व माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी सिंधुदुर्ग येथील कार्यकर्ता मेळाव्यात शिवसेनेवर जहरी टीका केली.
सावंतवाडीत नगराध्यक्ष निवडून आणून भाजपने शिवसेनेचे नाक कापले आहे. जळगाव पेक्षा सिंधुदुर्गमध्ये भाजपचे यश अचंबित करणारे आहे. मुंबई शिवसेनेचे नाक होते; पण तेथेही भाजपने शिवसेनेला नामोहरम केले आहे. आता लक्ष कोकण असून, याची सुरुवात सिंधुदुर्गमधून झाली आहे. त्यामुळे आता कोकणातही भाजपला असेच यश मिळणार असल्याचे पाटील यावेळी म्हणाले.
राज्यातील सहा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. निकालाच्या वेळी भाजप महाविकास आघाडीला पुरुन उरेल, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. तसेच महाआघाडीचे सरकार पाडण्यासाठी भाजप मुळीच प्रयत्न करणार नाही. मंत्रीपदावरून महाविकास आघाडीमध्ये प्रचंड नाराजी आहे.ही नाराजी संपणार नाही, असेही ते म्हणाले.