BJP DCM Devendra Fadnavis News: पुढील टर्ममध्ये २० लाखांचे बिनव्याजी कर्ज तरुणांना देण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. समाजाच्या प्रत्येक घटकाला घेऊन पंतप्रधान मोदी पुढे चालले आहेत. महाराष्ट्रातील सरकार हे मोदी यांच्यासोबत काम करणार आहे. हे वसुली सरकार नाही. मला निश्चित सांगायचे आहे की, नारायण राणे जगाच्या पाठीवर कुठेही असले तरी त्यांच्या डोळ्यासमोर नेहमी कोकण असते, कोकणचा विकास हे ध्येय असते. मोदी यांना सांगून नारायण राणे इंडस्ट्री कोकणात आणतील, कोकणचे चित्र बदललेले असेल. एकीकडे मोदी आणि दुसरीकडे नारायण राणे हे कोकणच्या विकासाचे कॉम्बिनेशन आहे, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग येथून भाजपाने नारायण राणे यांना उमेदवारी दिली आहे. नारायण राणे यांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचारसभेत देवेंद्र फडणवीस बोलत होते. ही निवडणूक देशाकरिता महत्त्वाची आहे. देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आपल्यासमोर केवळ दोनच पर्याय आहेत. एक म्हणजे विश्वगौरव मोदी, दुसरीकडे राहुल गांधी. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात २६ पक्षांची खिचडी आहे. तर, जगाच्या पाठीवर पंतप्रधान मोदी यांनी भारताला सन्मानाचे स्थान मिळवून दिले आहे. पंतप्रधान मोदी यांना आशिर्वाद देण्याची हीच वेळ आहेत, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले.
महायुती भक्कम आहे, आपली विकासाची गाडी पुढे जातेय
शरद पवार यांनी आपला जाहीरनामा जाहीर केला. हा जाहीरनामा राहुल गांधींचा चालणार आहे. आपली महायुती भक्कम आहे. आपली विकासाची गाडी पुढे जात आहे. तिकडे प्रत्येक जण म्हणतोय मी इंजिन आहे, तिकडे डबे नाहीत फक्त इंजिन आहे. उद्धव ठाकरेंच्या इंजिनमध्ये आदित्य ठाकरेंनाच जागा, शरद पवारांच्या इंजिनमध्ये सुप्रिया सुळेंनाच जागा, राहुल गांधींच्या इंजिनमध्ये सोनिया गांधी प्रियांका गांधी यांना जागा आहे. तुम्हाला जागा नाही. तुम्हाला जागा मोदी यांच्या इंजिनमध्ये आहे, त्यासाठी नारायण राणे यांना मतदान करा, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.