Devendra Fadnavis: महाराष्ट्राच्या राजकीय संघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयाने अद्याप निकाल दिलेला नाही. ठाकरे गट आणि शिंदे गटाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर सर्वोच्च न्यायालायने निकाल राखून ठेवला. शिंदे गटाच्या आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार असल्याचा दावा केला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून यासंदर्भात पडद्यामागे घडामोडी घडत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असतानाच आता उद्धव ठाकरे आता पुन्हा मुख्यमंत्री होणे अशक्य आहे, असा मोठा दावा भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
आजचे माझे भाकीत सांगतो की, एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील. त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळातच आम्ही निवडणुकांना सामोरे जाऊ. त्यामुळे हे सरकार स्थिर आहे. या सरकारमध्ये कुठलाही बदल होणार नाही. एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.
उद्धव ठाकरे आता पुन्हा मुख्यमंत्री होणे अशक्य आहे
उद्धव ठाकरे आता पुन्हा मुख्यमंत्री होणे अशक्य आहे. ज्यांनी सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी पाहिली आहे त्यांच्या हे लक्षात आले असेल की उद्धव ठाकरे हे बहुमत चाचणीला सामोरे गेले नाहीत. त्यांचे सरकार परत येऊ शकणार नाही. मी वकील आहे. हे सांगू शकतो की उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालय हे त्यांना परत आणून बसवणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबाबत अंदाज बांधणे योग्य राहणार नाही. जी आमची भूमिका आहे त्यामुळे आम्हाला असे वाटते की निकाल योग्य पद्धतीने लागेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. ते मुंबई तकशी बोलत होते.
दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादीचे काही आमदार आमच्या संपर्कात असून योग्य वेळी त्यांचा पक्षप्रवेश होईल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. तसेच आमदार नेहमीच संपर्कात असतात. सत्ताधारी पक्ष म्हणू काम करताना अनेकांशी संबंध निर्माण झाला आहे. या संबंधामुळे आणि आत्मविश्वासामुळे अनेक लोक बरोबर येतात. त्यामुळे आमच्या संपर्कात अनेक जण आहेत, त्यातील किती लोक भाजपात येतील हे आज निश्चित सांगता येणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"