BJP DCM Devendra Fadnavis News: मराठी माणसाचे ठेकेदार ते नाहीत. ते म्हणजे मराठी नाहीत, ते म्हणजे महाराष्ट्र नाही. आम्हीही मराठी माणूस आहोत. आमचा पक्षही मराठी माणसाच्या पाठीशी आहे. खऱ्या अर्थाने मराठी माणसाला निर्वासित कुणी केले असेल, तर ते उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात झाले आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
मीडियाशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्या पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याच्या विधानावरही भाष्य केले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट हा जो पक्ष आहे, तो काँग्रेसमध्ये विलीन करावा, असे त्यांच्या डोक्यात असेल. त्यात काही नवल नाही. यापूर्वीही शरद पवारांनी अनेकवेळा पक्ष तयार केला आणि अनेकवेळा काँग्रेसमध्ये गेले. त्यामुळे त्यांनी हा एक संकेत दिला आहे की, आता त्यांचा पक्ष चालवणे त्यांना शक्य होणार नाही. लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार साहेबांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
दरम्यान, पुढील २ वर्षांत अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसशी अधिक जवळीक साधतील किंवा त्यातील काहींना काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा पर्याय त्यांच्या पक्षासाठी चांगला असेल असंही वाटू शकते. तसेच काँग्रेस आणि आमच्या विचारधारेत फारसा फरक नाही. आमच्या दोघांचीही विचारधारा गांधी-नेहरू यावर वाटचाल करत आहे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. तसेच माझ्या पक्षाच्या विलिनीकरणाबाबत सहकाऱ्यांसोबत चर्चा केल्याशिवाय मी काहीही सांगू शकत नाही. वैचारिकदृष्ट्या आम्ही काँग्रेसच्या जवळ आहोत. परंतु पुढील काळातील निर्णय आणि रणनीती ही सामूहिकपणे विचार करून घेतले जातील. आम्हाला नरेंद्र मोदींसोबत जुळवून घेणे आणि ते पचवणे कठीण आहे असेही शरद पवार म्हणालेत.