Devendra Fadnavis On ED Action in Mumbai: ईडीने मुंबईत १५ ठिकाणी छापे टाकले आहेत. यामध्ये संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर आणि आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सुरज चव्हाण यांचाही समावेश आहे. ठाकरे गटाने गद्दार दिन साजरा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ईडीने मुंबईत मोठे ऑपरेशन राबविले आहे. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांसह पालिकेच्या अधिकाऱ्यांवर एकापाठोपाठ एक छापे टाकण्यात आले. यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर सूचक शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.
सुरुवातीला संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्या घरी छापेमारी करण्यात आली होती. पाटकर यांच्याशी संबंधित १० ठिकाणी छापे टाकण्यात आले. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीयांवरही छापेमारी सुरु आहे. ठाकरे गटाचे सचिव सुरज चव्हाण यांच्या निवासस्थानी ईडीने छापा टाकला आहे. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांसह पालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यावरही धाडी टाकण्यात आल्या आहेत. यासंदर्भात मीडियाशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले.
नेमकी काय कारवाई सुरू आहे हे मला माहिती नाही
नेमकी काय कारवाई सुरू आहे हे मला माहिती नाही. पण निश्चितपणे सांगतो की ज्यावेळेस मुंबई महानगरपालिकेमध्ये कोविड सेंटर्स सुरू करण्यात आले. त्यानंतर कोविड सेंटरमधील घोटाळा बाहेर आला, त्यावेळी अतिशय धक्कादायक माहिती बाहेर आली होती. कोणताही अनुभव नसलेल्या कंपन्या तयार झाल्या होत्या. लोकांच्या जिवाशी अक्षरशः खेळण्यात आले, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले.
ही चौकशी कुठपर्यंत पोहोचली, छाप्यात काय मिळाले हे ईडी सांगू शकेल
यासंदर्भातील चौकशी चालली आहे. ही चौकशी कुठपर्यंत पोहोचली, या छाप्यात काय मिळाले आहे हे ईडी सांगू शकेल. मला माहिती नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. तर, आदित्य ठाकरेंचे अतिशय निकटवर्तीय समजले जाणारे सुरज चव्हाण यांच्या घरावर ईडीने छापे टाकले. याबद्दल विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मला असे वाटते की ज्या-ज्या लोकांचे कनेक्शन असेल त्यांच्या घरीच ही छापेमारी चालली असेल. याबद्दल अधिकृत माहिती ईडीच देऊ शकेल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.