Devendra Fadnavis News: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढील टप्प्यासाठीच्या तयारीला पक्ष लागले आहेत. ०७ मे रोजी मतदान आहे. तर पुढील टप्प्यातील प्रचारसभा, बैठका यांना सुरुवात झाली आहे. यातच महाराष्ट्रात किती जागा मिळतील, यावरून महाविकास आघाडी आणि महाविकास आघाडी यांच्याकडून दावे-प्रतिदावे केले जात आहेत. यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात महायुतीला किती जागा मिळणार, याबाबत सूतोवाच केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक भाजपा नेते, मंत्री महाराष्ट्रात प्रचारासाठी येत आहे. प्रचारसभा, मेळावे घेताना पाहायला मिळत आहे. याबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विरोधी नेत्यांना ऐकण्यास लोकही उत्सुक नाहीत. आम्हाला यशाचा आत्मविश्वास आहेच. मागील निवडणुकांमध्ये पंतप्रधान मोदीच्या जेवढ्या सभा झाल्या तेवढ्याच यंदाही होत आहेत. एखाद-दुसरी जास्त असेल. फरक एवढाच की पूर्वी मोदी दिवसाला एक-दोन सभा करायचे, यंदा तीन-तीन सभा झाल्या आहेत. आमच्या नेत्याला ऐकण्यास लोक उत्सुक आहेत. त्यामुळे गर्दी होते, मग मोदींना का बोलावू नये, असा सवाल करत, विरोधकांकडे गर्दी जमत नाही. त्यांच्या नेत्यांना ऐकण्यास लोकही उत्सुक नाहीत, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
ठाकरे गटाशी पुन्हा जवळीक निर्माण होईल का?
पंतप्रधान मोदी यांनी उद्धव ठाकरेंबाबत केलेल्या विधानावरूनही आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. यावर, उद्धव ठाकरे रुग्णालयात असताना आमचा शिवसेनेशी टोकाचा संघर्ष होता. असे असूनही पंतप्रधान मोदी नियमितपणे उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना फोन करून विचारपूस करायचे. ही माणुसकी आहे. आम्ही शत्रू नाही. केवळ राजकीय, वैचारिक विरोधक आहोत. यासाठीच मोदींनी 'उद्या जर उद्धव ठाकरेंना वैयक्तिकदृष्ट्या काही मदत लागल्यास मी करेन, पण राजकीयदृष्ट्या मदत करणार नाही, असे स्पष्ट सांगितले. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार सोडले. पुन्हा जवळीक निर्माण होण्याची शक्यता मला तरी दिसत नाही, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार?
या लोकसभा निवडणुकीत महायुतीला किती जागा मिळतील, याबाबत सत्ताधारी आणि विरोधक दोघांकडून दावे केले जात आहेत. मला ही खात्री आहे की, जनता पंतप्रधान मोदींच्या पाठीशी आहे. मोदींचा १० वर्षांत रेकॉर्ड बघितल्यानंतर २०१९ मधील जागा तर आम्ही राखू. त्यापेक्षा अधिक म्हणजे ४० पेक्षा जास्त जागा नक्कीच जिंकू, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.