BJP DCM Devendra Fadnavis News: लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार शिगेला पोहोचला आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. यासाठी महायुतीसह महाविकास आघाडीचे नेते प्रचार, बैठका, मेळावे घेताना दिसत आहेत. विदर्भातील जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे. तसेच आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदावे मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांच्यासंदर्भात केलेल्या दाव्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचक शब्दांत प्रतिक्रिया दिली.
जेव्हा राजकारणाचा प्रश्न येतो, तेव्हा निर्णय घ्यावा लागतो. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही सहकाऱ्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देत मंत्रिपदाची शपथ घेतली, तेव्हा आम्ही शरद पवारांना भेटायला गेलो होतो. तेव्हा त्यांना विनंती केली होती की, तुम्ही आमच्याबरोबर या. कारण आम्हाला तुमच्या नेतृत्वाखाली काम करायचे आहे. त्यानंतर पुण्यात एका उद्योगपतीच्या घरी अजित पवार आणि शरद पवार यांची भेट झाली. यामधून असे संकेत दिसत होते की, आमची आणि त्यांची चर्चा सुरु होती आणि शरद पवार ५० टक्के तयार होते, असा दावा प्रफुल्ल पटेलांनी केला. पत्रकारांनी देवेंद्र फडणवीस यांना याबाबत प्रतिक्रिया विचारली.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर शरद पवार भाजपाबरोबर येण्यास ५० टक्के तयार होते, असे प्रफुल्ल पटेलांनी म्हटले आहे. यासंदर्भात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, आता या निवडणुकीत त्यावर काही बोलणार नाही. आधीदेखील या विषयासंदर्भात बोललो आहे. पण हे सत्य आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
दरम्यान, आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देशात लाट पाहायला मिळत आहे. विदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन सभा झाल्या. लोकांमध्ये सकारात्मकता दिसत आहे. विदर्भातील लोकसभेच्या सर्व जागा आम्ही जिंकणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा ऐकण्यासाठी लोकांमध्ये उत्कंठा पाहायला मिळते. नरेंद्र मोदी यांच्या दोन्ही सभांना अपेक्षेपेक्षा मोठी गर्दी होती. तीन-तीन तास लोक सभा ऐकतात, याचा अर्थ पंतप्रधान मोदी यांच्याबाबत लोकांना जिव्हाळा आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.