NCPला विरोधातही अन् सत्तेतही ठेवणे ही शरद पवारांची खेळी? देवेंद्र फडणवीस म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2023 12:10 PM2023-08-30T12:10:25+5:302023-08-30T12:14:04+5:30
Maharashtra Politics: २०२४ ची लोकसभा व विधानसभा निवडणूक तिघेही एकत्रित लढू आणि पुन्हा चांगल्या प्रकारे निवडून येऊ, असा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला.
Maharashtra Politics: काही महिन्यांपूर्वी अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या काही आमदारांसोबत पक्षात मोठी बंडखोरी करत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अर्थ खात्याचा कार्यभारही अजित पवारांकडे देण्यात आला. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याचे पाहायला मिळत आहे. अजित पवारांचा एक गट सत्तेत आणि शरद पवारांचा दुसरा गट विरोधात आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेत आणि विरोधात ठेवणे ही शरद पवार यांचीच खेळी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात असल्याचे सांगितले जात आहे. यासंदर्भात भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली.
एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा पाठिंबा मिळाल्याने आपली जागा भक्कम आहे, असे भाजपला वाटत असले तरी ही सर्व खेळी शरद पवारांचीच आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असल्याबाबत देवेंद्र फडणवीस यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. यावर बोलताना, शरद पवारांची एक खासियत आहे. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन अनेक दंतकथा तयार होत असतात. त्या कथा लोकप्रियही होतात. मग काही भक्त असेही आहेत की, जगात जे काही चालते ते शरद पवारच चालवतात, असे त्यांना वाटते. मला शरद पवारांबद्दल आदर आहे. पण काही भक्तांना असे वाटते. त्यामुळे हे जग आमचे पवारसाहेबच चालवतात, अशाप्रकारे बोलले जाते, असा खोचक टोला देवेंद्र फडणवीसांनी लगावला. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.
२०२४ ची लोकसभा व विधानसभा निवडणूक तिघेही एकत्रित लढू
मला असे वाटते की, आता आम्ही तिघे एकत्रित आहोत. अतिशय भक्कपणे एकत्र आहोत. २०२४ ची लोकसभा आणि विधानसभा निवडणूक तिघेही एकत्रित लढू. पुन्हा आम्ही निवडून येऊ. चांगल्या प्रकारे आम्ही निवडून येऊ. आमच्या जागा आणखी वाढतील. जागा कमी होणार नाहीत. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. अनुभवी नेते आहेत. त्यामुळे आवश्यकता असेल तर अजित पवार त्यांचा सल्ला घेतात. कधी आम्हालाही शरद पवार सल्ला देत असतात, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या कामात हस्तक्षेप चालविला असल्याच्या बातम्या येत असताना आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना चाप लावला आहे. धोरणात्मक निर्णयाच्या सर्व फायली या अजित पवार यांच्याकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जातील आणि तेथून त्या आपल्याकडे येतील असे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांच्या निर्देशानुसार देण्यात आले आहेत.