Raj Thackeray And Devendra Fadnavis Over EVM Machine: लोकसभा निवडणूक अवघ्या काही आठवड्यांवर येऊन ठेपली असून, सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरू असताना मनसेची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून विविध मतदारसंघांचा आढावा घेत कार्यकर्त्यांचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. यातच राज ठाकरे यांनी ईव्हीएम मशीनबाबत काही प्रश्न उपस्थित केले. यावर देवेंद्र फडणवीस यांनी मोजक्या शब्दांत उत्तर दिले.
जगभर मतदान शिक्क्यावर होत असेल, जगभरातील पुढारलेल्या देशांमध्ये तशा प्रकारचे मतदान होत असेल, तर आपणच का व्होटिंग मशीन घेऊन बसलो आहोत. बटण दाबल्यावर कळतच नाही की, मतदान झाले आहे की नाही ते. फक्त एक छोटासा आवाज येतो. यापलीकडे काही होत नाही. मी ज्याला मतदान केले आहे, त्याला ते मिळाले का? मध्यंतरी काहीतरी काढले होते की, मतदान झाल्यानंतर स्लीप येणार, असे राज ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले होते. यावर पत्रकारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रतिक्रिया विचारली.
पत्रकारांनी राज ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर देवेंद्र फडणवीस यांनी मोजक्या शब्दांत सूचक भाष्य केले. याआधी मागे त्यांना ईव्हीएम पटले होते. आता पुन्हा पटत नाही. पुन्हा पटेल, असे उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
दरम्यान, वरती केंद्रात नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करायचे आहे म्हणून खाली जे वाट्टेल ते सुरू आहे ते चूकच आहे आणि फक्त आजच्यापुरता विचार करून चालणार नाही. अनेक तरुण-तरुणी राजकारणात येऊ इच्छित असतील तर त्यांच्यासमोर काय आदर्श आपण ठेवतो? त्यांच्यासमोर जर शिवीगाळ करणारे, एकमेकांना वाट्टेल ते बोलणारे असे आदर्श असतील तर ते तरी का येतील राजकारणात? असा सवाल राज ठाकरेंनी केला आहे.