Maharashtra Politics: छत्रपती संभाजी महाराजांबाबत विधान; देवेंद्र फडणवीसांचे अजित पवारांना प्रत्युत्तर, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2022 02:27 PM2022-12-31T14:27:08+5:302022-12-31T14:27:56+5:30
Maharashtra News: अजित पवारांनी छत्रपती संभाजी महाराजांबाबत केलेल्या विधानाचा देवेंद्र फडणवीसांनी खरपूस शब्दांत समाचार घेतला.
Maharashtra Politics: महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजले. या अधिवेशनात अनेकविध मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधानसभेत केलेल्या एका विधानावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. यावरून भाजप नेते आणि शिंदे गटाचे नेते आक्रमक झाले असून, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यावरून अजित पवारांना प्रत्युत्तर दिले आहे.
विधानसभेत बोलताना, आपण महाराष्ट्रामध्ये राहत असून इथे अंधश्रद्धेला खतपाणी घातले जात नाही. तसेच 'बाल शौर्य पुरस्कार' हा किमान स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीदिनी देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करावी, अशी मागणीही त्यांनी केली. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते, धर्मवीर नव्हते. त्यांनी धर्माचा कधीच पुरस्कार केला नाही, असे अजित पवार यांनी स्पष्ट शब्दात सांगितले. संभाजी महाराजांचा उल्लेख हा स्वराज्यरक्षक असाच करावा, असेही अजित पवार यांनी म्हटले आहे. यावरून अजित पवारांवर टीका करण्यात येत असून, देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना प्रत्युत्तर दिले आहे.
छत्रपती संभाजी महाराजांनी धर्माचे रक्षण केले
छत्रपती संभाजी महाराजांनी धर्माचे रक्षण केले. धर्म, स्वधर्म आणि हिंदू धर्म यांचे रक्षण केले. त्यांना औरंगजेबाने का मारले? संभाजी महाराजांना धर्मांतर करण्यासाठी सांगितले गेले, पण त्यांनी मान्य केले नाही. स्वदेश, स्वभूमी आणि स्वधर्मासाठी हालअपेष्टा होऊन त्यांचे बलिदान झाले. त्यांच्या शरिराचे अक्षरशः तुकडे केले. तरी छत्रपती संभाजी महाराजांनी स्वधर्म, स्वराष्ट्राची भाषा सोडली नाही. म्हणून अजित पवार आणि त्यांच्या विचारांच्या लोकांनी कितीही प्रयत्न केला तरी, छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक तर होतेच पण ते धर्मवीरही होते, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
दरम्यान, महाराष्ट्राच्या प्रशासनाला जे इन्फेक्शन झालं होतं, ते दूर करण्याचे काम शिंदे यांच्या नेतृत्वात सरकारने केले आहे. शासन-प्रशासन आता उत्तम काम करत असून अनेक चांगले निर्णय घेण्यात आले आहेत. २०२३ मध्ये महाराष्ट्राला वेगाने विकास पथावर नेण्याचे काम आमचे सरकार करेल, असा विश्वास व्यक्त करत, शरद पवारांनी केलेल्या विधानावर पलटवार केला. शरद पवार यांनी नरेटिव्ह तयार करायच्या आधी अनिल देशमुख यांच्या जामीनाबद्दल न्यायालयाचे आदेश वाचावेत. मग नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करा, मग तुमच्या लक्षात येईल न्यायालयाने काय म्हटले आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"