BJP DCM Devendra Fadnavis News: लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या तीन टप्प्यांचे मतदान पार पडले असून, आता उर्वरित पुढील टप्प्यांसाठी प्रचार शिगेला पोहोचताना पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एकामागून एक सभा महाराष्ट्रात होत आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीला या लोकसभा निवडणुकीत किती जागा मिळतील, याचे भाकित राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी केले आहे. या दाव्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिश्किल शब्दांत भाष्य केले आहे.
मागच्या निवडणुकीत पाच वर्षांपूर्वी काँग्रेस पक्षाने एक जागा जिंकली होती. राष्ट्रवादी काँग्रेसला ४ जागा मिळाल्या होत्या. एक एमआयएमला मिळाली. त्यावेळी एकंदरीत सहा जागा विरोधी पक्षांना मिळाल्या होत्या. आता असे दिसत आहे की, आम्हा लोकांची महाविकास आघाडीची संख्या ही ३० ते ३५ याच्या आसपास जाण्याची शक्यता आहे. त्यात काँग्रेसला १०-१२ जागा मिळतील. आम्हाला ८ ते ९ जागा मिळतील, असे भाकित शरद पवार यांनी केले. पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांना याबाबत प्रतिक्रिया विचारण्यात आली.
अरे बापरे! शरद पवारांचे अंतःकरण किती उदार आहे
शरद पवार यांनी महायुतीला १२-१३ जागा दिल्या. शरद पवारांचे अंतःकरण किती उदार आहे, असा मिश्किल टोला लगावत, सध्या सगळीकडे भाजपामय असे वातावरण आहे. भाजपाला निवडून द्यायचे असे जनतेने ठरवले आहे. आमचा विजय निश्चित आहे. विरोधक बावचळले असून ते वेगवेगळ्या प्रकारचा अजेंडा सेट करणे, वेगवेगळे विधाने करणे, षड्यंत्र करणे असे प्रकार करताना पाहायला मिळत आहेत. त्यांनी काही केले तरी भाजपा जिंकेल असा आम्हाला विश्वास आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
दरम्यान, राज ठाकरे हे आमच्या महायुतीचे घटक पक्ष आहेत. त्यामुळे त्यांना मैदानाची परवानगी मिळाली तर त्यामध्ये चूक काय आहे, त्यांनी ते मैदाना बूक केले होते. साम, दाम, दंड , भेद अशी निती काँग्रेसकडून अवलंबवली जात आहे. येत्या काळात काँग्रेस कोणत्याही थराला गेले तरी तरी जनता आमच्याबरोबर आहे, या शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी टीकास्त्र सोडले.