Devendra Fadnavis News: ही निवडणूक साधी निवडणूक नाही. ही निवडणूक देशाची निवडणूक आहे. एकीकडे विश्वगौरव नरेंद्र मोदी आहेत, तर दुसरीकडे राहुल गांधी आहेत. हा देश कुणाच्या हाती द्यायचा, याचा निर्णय तुम्हाला करायचा आहे. महायुतीत एकीकडे शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस गट, रामदास आठवले यांचा पक्ष, कवाडे यांचा पक्ष, जानकरांचा रासप आहे आणि आता राज ठाकरेंच्या मनसेची साथ महायुतीला लाभली आहे. तर दुसरीकडे त्या ठिकाणी राहुल गांधींची २६ पक्षांची खिचडी आहे, असा खोचक टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारसभेला संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. राहुल गांधींना त्यांच्या खिचडीचे लोक नेता मानायला तयार नाहीत. परवा कम्युनिस्ट पक्षाचे मुख्यमंत्री म्हणाले की, राहुल गांधी हे अपरिपक्व आहेत. ते देशाचे नेतृत्व करु शकत नाहीत. त्यांच्या आघाडीची अवस्था अशी आहे की, राहुल गांधी यांना नेता मानायला शरद पवार आणि उद्धव ठाकरे तयार नाहीत, अशी फिरकी देवेंद्र फडणवीस यांनी घेतली.
नवनीत राणा या प्रचंड मताने निवडून येणार आहेत
मी अमरावतीचा भाचा आहे. माझी आई, माझे मामा अमरावतीचे आहेत. त्यामुळे माझ्याकरिता ही भूमी महत्त्वाची आहे. त्यामुळे जेवढे प्रेम नागपूरवर आहे, तेवढेच प्रेम अमरावतीवर आहे. अमरावतीत आम्ही खासदार नवनीत राणा यांना निवडून आणण्याकरता सर्वजण इथे आलो आहोत. अत्यंत आनंदाची गोष्ट आहे, ज्यांनी या देशामध्ये अनुच्छेद ३७० रद्द केले, ते देशाचे कणखर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह प्रचारासाठी आले. अमरावतीच्या इतिहासात सगळ्यात मोठी सभा ही होतेय. तुमची उपस्थिती ही निश्चितपणे सांगते आहे की, नवनीत राणा या प्रचंड मताने निवडून येणार आहेत, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
दरम्यान, परवा शरद पवार आले होते. शरद पवार म्हणाले, मागच्या वेळेस नवनीत राणा यांना पाठिंबा दिला होता याबद्दल माफी मागतो. तुम्हाला माफी मागायची असेल तर विदर्भाची मागा, कारण तुम्ही सातत्याने विदर्भावर, अमरावतीवर अन्याय केला. तुम्ही सातत्याने आम्हाला मागास ठेवले. त्यामुळे तुम्ही माफी मागितलीच पाहिजे, पण जनेतेची मागितली पाहिजे. इतके वर्ष राजकारण केले, पण विदर्भाला काही दिले नाही, या शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला.