मुंबई : समविचारी पक्ष एकत्र आल्यामुळे देशभर काँग्रेस व अन्य विरोधी पक्षांच्या उमेदवारांचा विजय झाला आहे. सर्व पक्ष एकवटल्यामुळे भाजपाचा पराभव झाला असून, दोन जागा वगळता भाजपाची सगळीकडे पिछेहाट झाली आहे. पालघर निवडणूक समविचारी पक्षांनी एकत्र लढविली असती तर तिथेही भाजपाचा पराभव करता आला असता, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी गुरुवारी सांगितले.पत्रकार परिषदेत अशोक चव्हाण म्हणाले, सर्व पक्ष एकवटल्याने भाजपाचा पराभव झाला. भंडारा गोंदिया निवडणूक एकत्रित लढल्याने जिंकता आली. पालघरमध्ये मात्र मतांचे विभाजन झाले म्हणून दामू शिंगडा यांचा पराभव झाला. पुढील निवडणुकीत सर्व समविचारी पक्षांना एकत्र घेऊन लढवू. पालघरमधील भाजपाचा विजय हा गौडबंगाल करून झाला आहे. भंडारा-गोंदियात फेरमतदान झाले; मात्र पालघरमध्ये फेरमतदान करू दिले नाही. या दोन्ही ठिकाणी निवडणूक आयोगाने वेगळा न्याय का लावला? असा प्रश्न अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला.उद्धव ठाकरे यांनी पालघर निकालानंतर भाजपावर टीका करण्यापेक्षा काही स्वाभिमान शिल्लक असल्यास सत्तेतून बाहेर पडावे. निकालानंतरच्या पत्रपरिषदेत उद्धव ठाकरे यांनी तांत्रिक गोष्टींवर भर दिला. शिवसेना केवळ टीका करते, ठोस भूमिका घेत नाही. लोकांना फसविण्याचा प्रकार शिवसेनेने थांबवावा, असेही चव्हाण म्हणाले.
समविचारी पक्ष एकत्र आल्याने भाजपाचा पराभव, अशोक चव्हाण यांचे वक्तव्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2018 6:06 AM