मुंबई: राणा विरुद्ध सेना वादात भाजपनं उडी घेतली आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या काल राणा दाम्पत्याच्या भेटीसाठी खार पोलीस ठाण्यात पोहोचले होते. तिथे उपस्थित असलेल्या शिवसैनिकांनी कारची काच फोडल्याचा आरोप सोमय्यांनी केला. तर सोमय्यांनी अंगावर कार घालण्याचा प्रयत्न असा प्रत्यारोप शिवसेनेकडून करण्यात आला. त्यामुळे भाजप विरुद्ध शिवसेना संघर्ष पेटला आहे. आता हा संघर्ष दिल्लीपर्यंत जाणार आहे.
भाजप नेत्यांचं शिष्टमंडळ उद्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेणार आहे. भाजप नेत्यांवर होत असलेल्या हल्ल्यांप्रकरणी ही भेट होणार असल्याचं सोमय्यांनी सांगितलं. 'राज्यात ठाकरे सरकारकडून पोलिसांचा वापर माफियांसारखा केला जात आहे. केंद्रानं झेड दर्जाची सुरक्षा पुरवलेल्या व्यक्तीच्या जीवाला धोका निर्माण केला जात आहे. या सगळ्याची माहिती केंद्रीय गृहमंत्र्यांना देण्यात येईल,' असं सोमय्या म्हणाले.
उद्या सकाळी साडे दहा वाजता किरीट सोमय्याअमित शाहांची भेट घेतील. यावेळी आपल्यासोबत आठ आमदार, खासदार असतील, अशी माहिती सोमय्यांनी दिली आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, आमदार आशिष शेलार, मिहिर कोटेचा, खासदार मनोज कोटक यांच्यासह आणखी काही लोकप्रतिनिधी सोमय्यांसोबत उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे नेत्यांवरील हल्ल्यांवरून भाजपनं आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसत आहे.