नवी दिल्ली: राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडल्याचा दावा करणाऱ्या भाजप नेत्यांनी आज केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांची भेट घेतली. माजी खासदार किरीट सोमय्यांच्या नेतृत्त्वाखाली पक्षाचे ८ विद्यमान खासदार-आमदार राय यांना भेटले. राज्यात घडत असणाऱ्या घटनांची माहिती भाजप नेत्यांच्या शिष्टमंडळानं राय यांना दिली. राय यांनी महाराष्ट्रातील स्थितीबद्दल चिंता व्यक्त केल्याची माहिती सोमय्यांनी दिली.
भाजप नेत्यांनी राय यांच्यासोबत २० ते २५ मिनिटं चर्चा केली. भाजपच्या नेत्यांवर सातत्यानं होत असलेल्या हल्ल्यांची आणि ढासळलेल्या कायदा, सुव्यवस्थेची माहिती राय यांनी देण्यात आल्याचं सोमय्यांनी सांगितलं. या प्रकरणी अहवाल मागवून घेणार असल्याचं राय म्हणाले. ठाकरे सरकारच्या कार्यकाळात राज्यात माफिया राज सुरू असल्याची टीका सोमय्यांनी पुन्हा एकदा केली.
मला केंद्राकडून झेड दर्जाची सुरक्षा आहे. मात्र तरीही माझ्यावर हल्ला झाला. भारत सरकारच्या कमांडोंना दगडांनी, बुटांनी मारण्यात आलं. मात्र पोलीस आयुक्त संजय पांडेंनी खोटा एफआयआर दाखल केला. त्यामुळेच हल्ला करणाऱ्या शिवसैनिकांना जामीन मिळाला. संजय पांडे मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत की एका कुटुंबाचे आयुक्त आहेत, असा सवाल सोमय्यांनी उपस्थित केला.