मुंबई/पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत सोमवारी मुंबईत झालेल्या चर्चेत विधानसभा निवडणुकीनंतर आपल्या पक्षाला मुख्यमंत्रिपद देण्याची मागणी केल्याची चर्चा मंगळवारी राजकीय वर्तुळात होती. मात्र, अशी कोणतीही मागणी केली नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात बिहार पॅटर्न राबवला जावा आणि मला मुख्यमंत्रिपद द्या, अशी मागणी अजित पवारांनी अमित शाह यांच्याकडे केल्याची चर्चा आहे. मात्र, यामध्ये कसलेही तथ्य नाही, तशी कोणतीही चर्चा झालेली नाही. मी अमित शाह यांच्याशी कापूस, सोयाबीन आणि कांदा उत्पादकांसह इतर प्रश्नांवर चर्चा केली. यापुढे कांद्याची निर्यातबंदी होऊ नये, अशी विनंती केल्याचे ते म्हणाले.
मैत्रीपूर्ण लढतींचा प्रस्ताव नाही : पटेल
२५ मतदारसंघांमध्ये मैत्रीपूर्ण लढती करण्याचा प्रस्ताव अमित शाह यांना अजित पवार गटाने दिला असल्याची चर्चाही होती. मात्र, अशी चर्चा झालेली नसल्याचे पक्षाचे ज्येष्ठ नेते खा. प्रफुल्ल पटेल यांनी ‘लोकमत’ला सांगितले. आम्ही महायुतीचा घटक पक्ष आहोत. लवकरच जागावाटपाचा फॉर्म्युला ठरेल, असे पटेल म्हणाले.