मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी, गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू (Mansukh Hiren Death Case) आणि त्यानंतर पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांना झालेली अटक या घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर भाजप आता आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपने एकामागून एक ट्विट केली आहेत. यामध्ये विविध प्रकरणांचे दाखले देत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. (bjp demands resign of anil deshmukh over various issues)
हिंगणघाटातील तरुणीच्या मृत्यू ते पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणासह अनेकविध घटनांचा हवाला देत भाजपने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर निशाणा साधला आहे. राज्यात सुरू असलेल्या एकूणच घडामोडींवर टीका करत भाजपने अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. भाजपने एकामागून एक अनेक घटनांच्या संदर्भात ट्विट करत गृहमंत्री अनिल देशमुख यांना थेट सवाल केले आहेत.
हिंगणघाटातील तरुणीला न्याय कधी मिळणार
एका तरुणीला भर रस्त्यात पेट्रोल टाकून जाळले जाते. या घटनेत तिचा दुर्दैवी मृत्यू होतो. घटनेला एक वर्ष पूर्ण झालं, मात्र अजूनही दोषीवर कठोर कारवाई करण्यात आली नाही. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तिला न्याय कधी मिळणार, हे एकदाचं जाहीर करावं, अशी मागणी भाजपने ट्विटच्या माध्यमातून केली आहे.
मारेकरी अजूनही मोकाट फिरताहेत, हीच शोकांतिका!
महाराष्ट्रासारख्या संतांच्या भूमीत निर्दोष साधूंची १०० जणांच्या जमावाकडून निर्घृण हत्या होते, मात्र त्यावर एक शब्दही आपले गृहमंत्री अनिल देशमुख हे काढत नाहीत, कारवाई तर दूरच. मारेकरी अजूनही मोकाट फिरताहेत, हीच शोकांतिका!, असे भाजपने दुसऱ्या एका ट्विटमध्ये म्हटले आहे.
NIA ने दररोज विनाकारण बातम्या पसरवू नयेत; जयंत पाटील यांचा सल्ला
तुमचं कर्तव्य विसरलात की आठवण करून द्यावं लागेल
माजी मंत्री संजय राठोड पूजा चव्हाण या तरुणीला आत्महत्येसाठी प्रवृत्त करतो. त्याचा फक्त राजीनामा घेतला जातो, मुख्यमंत्र्यांच्या दबावामुळे… मग या सर्व प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख साहेब तुम्ही काय केलं? तुमचं कर्तव्य विसरलात की आठवण करून द्यावं लागेल!, अशी टीका भाजपकडून करण्यात आली आहे.
सदर घटनांसह शर्जिल उस्मान, सत्ताधारी राष्ट्रवादी पक्षाचा युवा प्रदेशाध्यक्षावर असलेला बलात्काराचा आरोप, पोलीस भरतीबाबतची घोषणा अशा काही मुद्द्यांवरून भाजपने अनेक सवाल करत गृहमंत्री अनिल देशमुख यांना घेरल्याचे पाहायला मिळाले आहे.
दरम्यान, अँटालिया आणि मनसुख हिरेन प्रकरण हाताळण्यात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख अपयशी ठरले आहेत. या प्रकरणात सर्व पुरावे असतानाही सचिन वाझे यांचा बचाव करण्याचा प्रयत्न अनिल देशमुखांनी केला. त्यामुळे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अनिल देशमुख यांना तात्काळ घरी पाठवावे, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली.