नागपूर: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर नव्या शिंदे-फडणवीस सरकारने विश्वासदर्शक ठराव बहुमताने जिंकला. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य नेते आपापल्या मतदारसंघात गावी परतले. देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात जंगी स्वागत करण्यात आले. भाजपचे हजारो कार्यकर्ते, महत्त्वाचे नेते यावेळी उपस्थित होते. पहिल्या २ महिन्यात खदखद लक्षात आली; नजर ठेवून होतो, योग्यवेळी करेक्ट कार्यक्रम केला, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला.
नागपुरात पोहोचल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी एक प्रकारे जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी नवे सरकार कसे स्थापन झाले, यावर सविस्तर भाष्य केले. अनेक आतल्या गोष्टी सांगितल्या. मात्र, ही एक सस्पेन्स फिल्म आहे, हळूहळू सगळं तुमच्यासमोर येईल. मात्र, महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्या दोन महिन्यातच ही खदखद माझ्या लक्षात आली होती. या सर्व प्रकारावर मी नजर ठेवून होतो. योग्यवेळी करेक्ट कार्यक्रम केला, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
महाराष्ट्राला देशातील नंबर एकच राज्य आम्ही बनवू
आम्ही विश्वास प्रस्ताव प्रचंड बहुमताने जिंकला. १६४ मत विरुद्ध ९९ अशी लॅन्डस्लाईड विक्ट्री आम्ही मिळवली आहे. ही टर्म आम्ही पूर्ण करू. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्राला देशातील नंबर एकच राज्य आम्ही बनवू, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. २०१९ सालीच भाजपला लोकांची पसंती मिळाली, पण चुकीच्या पद्धतीने महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले. या काळात मला मुख्यमंत्रीपद मिळाले नाही याचे दु:ख नव्हते, तर, आलेल्या सरकारने राज्याच्या विकासाची कामे केली नाही. तसेच, मराठवाडा तसेच दुष्काळग्रस्त भागातील कामेही अडली होती. ते पाहून चिंता वाटायची, याहीवेळेस सक्षम विरोधी पक्षनेता म्हणून काम केले. कोरोनाच्या काळातही जीवाची पर्वा न करता काम केले, असे देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.
एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी मी पुढाकार घेतला
शिवसेनेचाच मुख्यंमत्री होणार असा निर्णय भाजपकडून घेण्यात आला व एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी मी पुढाकार घेतला. आपण बाहेर राहून या सरकारला मदत करायची माझी तयारी होती, तसे सांगितलेही होते, पण वरिष्ठांनी सांगितल्यानुसार मी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री पदाचा प्रवास पूर्ण होणारच, आम्ही मिळून काम करू आणि पुढील अडीच वर्ष हे सरकार चालेल आणि आम्ही यशस्वी कामगिरी करून दाखवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यासह सरकार आलेलं आहे. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा भागातील प्रश्नांना मार्गी लावू आणि समस्याग्रस्त भागांच्या विकासाच्या दृष्टीने कार्य करू, असे फडणवीस म्हणाले. जे काही यश मिळाले आहे ते पंतप्रधान मोदी व वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनामुळेच मिळाले असल्याचेही फडणवीसांनी सांगितले.