मुंबई – राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं रश्मी ठाकरेंशी बोलणं झाल्याची माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. नुकतेच शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी शिवसेना-भाजपा युती पुन्हा येऊ शकते असं विधान केले. त्याचसोबत रश्मी ठाकरे मुख्यमंत्री झाल्यास कुणालाही हरकत नाही असं विधान केल्याने राजकीय वर्तुळात भलतीच चर्चा सुरु होती.
मग या सगळ्यात देवेंद्र फडणवीसांचं(Devendra Fadnavis) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याशी फोनवरुन संवाद झाल्याचं प्रदेशाध्यक्षांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारी आहे. अलीकडेच त्यांच्या मानेवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. प्रकृतीच्या कारणास्तव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या हिवाळी अधिवेशनालाही येण्याचं टाळलं. उद्धव ठाकरे सध्या घरीच आराम करत असून व्हिडिओ कॉन्फरन्सच्यामाध्यमातून ते बैठका आणि कार्यक्रमाला हजेरी लावत आहेत.
ऑपरेशननंतर उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांना आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला असून ते कुणालाही भेटू शकत नव्हते. मात्र प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी मातोश्रीवर फोन केला. उद्धव ठाकरे आराम करत असल्याने रश्मी ठाकरेंनी फोन उचलला. फडणवीसांनी उद्धव ठाकरेंच्या प्रकृतीची विचारपूस करत कठीण प्रसंगात आम्ही तुमच्यासोबत आहोत अशी ग्वाही फडणवीसांनी दिली. या फोनमध्ये काय संवाद झाला याचा किस्सा चंद्रकांत पाटलांनी सांगितला.
चंद्रकांत पाटील काय म्हणाले?
उद्धव ठाकरे हे आम्हा सगळ्यांचे चांगले मित्र आहे. हिंदुह्द्रयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे महाराष्ट्रावर खूप मोठे उपकार आहेत. महाराष्ट्राची संस्कृती कोणाच्या आजारपणावर टिंगळटवाळी करणारी नाही. मी ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघात वाढतो त्या हे शिकवलं जात नाही. उद्धव ठाकरेंच्या तब्येतीला आराम पडो यासाठी मी रोज सकाळी प्रार्थना करणाऱ्यासाठी ज्या देवांना समोर आणतो त्यांच्याकडे प्रार्थना करतो. त्यांच्या तब्येतीकडे पाहता विधानसभा, मंत्रालयाकडे येण्याचा त्यांनी हट्ट धरू नये. देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांचे ऑपरेशन झाल्यानंतर तात्काळ रश्मीवहिनींशी फोनवरुन संवाद साधत ठाकरे कुटुंबाचे आमच्यावर उपकार आहेत. आम्ही तुमच्या सोबत आहोत असं म्हटल्याचं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील(BJP Chandrakant Patil) म्हणाले.