Devendra Fadnavis: राज्याचे राजकारणात अनेकविध मुद्द्यांवरून तापल्याचे दिसत आहे. यातच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीची आठवण काढत पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत. अलीकडेच अजित पवार काही तासांसाठी नॉट रिचेबल झाले होते. यावेळी देवेंद्र फडणवीस कुठे होते, याबाबत खुद्द उपमुख्यमंत्र्यांनी खुलासा केला आहे.
नॉट रिचेबल असण्यावरून अजित पवार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटले होते की, काम करत असताना मला पित्ताचा त्रास होऊ लागला. जागरण आणि दौरे जास्त झाले की मला पित्ताचा त्रास होतो. तो खूप वर्षांपासूनचा त्रास आहे. त्यानंतर मी डॉक्टरांकडून औषधे घेतली आणि झोपलो. त्यानंतर बरे वाटू लागल्यानंतर कार्यक्रम सुरू केले. परंतु याच काळात माध्यमे कसल्याही बातम्या दाखवत होती. त्या बातम्या पाहून मला वाईट वाटत होते, असे अजित पवारांनी सांगितले. एका कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस यांना अजित पवारांसोबत असलेल्या नात्याविषयी विचारण्यात आले.
अजित पवार नॉट रिचेबल असताना देवेंद्र फडणवीस नेमके कुठे होते?
अजित पवार आणि तुमचे चांगले संबंध आहेत. विरोधी पक्षनेता असूनही ते तुमच्याबाबत सॉफ्ट असतात. पहाटेच्या शपथविधीनंतर तुम्ही कधी भेटलात असे देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आले. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, त्या घटनेनंतर अजित पवार खूप डिफेन्सिव्ह झाले. कोरोना काळात केवळ दोन बैठकांसाठी आम्ही भेटलो. मात्र, त्यापूर्वी कधीही भेटलो नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच परवा अजितदादा कुठल्या तरी पुण्याच्या कार्यक्रमातून निघून गेले. त्या दिवशी मुंबईतल्या घरी फाइल्स क्लिअर करण्याचे काम करत होतो. त्यावेळी परत सुरू झाले, अशा चर्चा सुरू झाल्या. पण त्या दिवशी माझ्या घरी काही पत्रकारांना गप्पा मारायला बोलावले होते. त्यामुळे पत्रकार माझ्याच घरी होते. पण तिकडे चर्चा अशा सुरू होत्या की, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार नागपूरला भेटले. मी मुंबईत आणि अजित पवार कुठे आहेत हे मला माहिती नव्हते, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. ते मुंबई तकशी बोलत होते.
दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादीचे काही आमदार आमच्या संपर्कात असून योग्य वेळी त्यांचा पक्षप्रवेश होईल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. तसेच आमदार नेहमीच संपर्कात असतात. सत्ताधारी पक्ष म्हणू काम करताना अनेकांशी संबंध निर्माण झाला आहे. या संबंधामुळे आणि आत्मविश्वासामुळे अनेक लोक बरोबर येतात. त्यामुळे आमच्या संपर्कात अनेक जण आहेत, त्यातील किती लोक भाजपात येतील हे आज निश्चित सांगता येणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"