Maharashtra Political Crisis: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) याचे नवे सरकार स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडीतील नेते नव्या शिंदे-फडणवीस सरकारवर सातत्याने निशाणा साधताना पाहायला मिळत आहेत. याला भाजपकडून प्रत्युत्तरही दिले जात आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलेल्या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे.
शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना, संजय राऊत सरकारविरोधात वर्तमानपत्रात लिहीत होते म्हणून केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत त्यांना अटक केली, असा आरोप शरद पवारांनी केला होता. यासंदर्भात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून राज्य आणि देशपातळीवर सातत्याने केंद्रातील भाजपा सरकारवर टीकास्र सोडण्यात येत आहे. याबाबत मीडियाशी बोलताना, देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला आहे.
कामाने कामाला उत्तर देऊ शकत नाही
आजकाल ही फॅशन झालीये की तुम्ही जेव्हा कामाने कामाला उत्तर देऊ शकत नाहीत, तेव्हा अशी टीका करायची. मोदींच्या कामाचा आवाका एवढा मोठा झालाय आणि ज्या प्रकारची कामं त्यांनी केली आहेत, की त्याचं कोणतेही उत्तर हे विरोधक देऊ शकत नाही. विरोधकांना एवढाच सल्ला देईन की, मोदींनी विकासाची जी एक रेषा तयार केली आहे ती खोडण्याऐवजी तिच्याबाजूला एक त्याहून मोठी रेषा आखण्याचा प्रयत्न करा, असे प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
दरम्यान, दरवर्षी गणेशोत्सवात अमित शाह मुंबईत येतात. काही गणपतींचे ते दर्शन घेतात. लालबागचा राजा, आशिष शेलार यांच्या गणपतींचे दर्शन घ्यायला ते जाणार आहेत. मुख्यमंत्री आणि माझ्याकडेही ते गणपती बाप्पांच्या दर्शनाला येतील. आमचे वरिष्ठ नेते येतायत तर त्यांच्यासोबत एक बैठक व्हावी, अशी आम्ही विनंती केली होती. त्यासाठीही त्यांनी वेळ दिला आहे. एका शाळेचेही ते उद्घाटन करणार आहेत. याव्यतिरिक्त त्यांचा कोणताही कार्यक्रम नाही. मुंबई त्यांची जन्मभूमी आहे. मुंबईशी त्यांचे वेगळे नाते आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्याबाबत बोलताना दिली.