मुंबई: देशातील कोरोनाची गंभीर परिस्थिती, ऑक्सिजन, बेड्स, रेमडेसिवीर इंजेक्शनची कमतरता, कोरोना लसींचा तुटवडा यांवरून राजकारण अधिकच तापताना दिसत आहे. केंद्र आणि राज्य सरकार एकमेकांसमोर उभे ठाकले असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहे. केंद्रातील भाजप नेत्यांनी ठाकरे सरकारवर टीका केल्यानंतर काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी भाजप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधला. आता, देवेंद्र फडणवीस यांनी प्रियंका गांधींना प्रत्युत्तर दिले आहे. (devendra fadnavis replied priyanka gandhi on her statement)
प्रियांका गांधी, राहुल गांधी आणि सोनिया गांधी अशा प्रकारे टीका करून, पत्रकार परिषदा घेऊन देशात वेगळे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिले. यासंदर्भात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी थेट गांधी कुटुंबीयांवरच निशाणा साधला.
महाराष्ट्रातील सरकारसोबत चर्चा केली आहे का?
काँग्रेस आणि गांधी कुटुंबीयांना देशात नकारात्मकतेचे वातावरण निर्माण करायचे आहे. मला प्रियांका गांधींना विचारायचे आहे की, त्यांनी या त्यांच्या मुद्द्यांवर कधी महाराष्ट्रातील सरकारसोबत चर्चा केली आहे का? इथे परिस्थिती काय आहे? देशातल्या एकूण करोनाबाधितांच्या मृत्यूंपैकी ३८ ते ४० टक्के मृत्यू महाराष्ट्रात होत आहेत. एकूण करोनाबाधितांपैकी ३५ ते ४० टक्के आणि एकूण कोरोना केसेसपैकी ३५ ते ३७ टक्के केसेस महाराष्ट्रात आहेत, असे फडणवीस म्हणाले.
महाराष्ट्रासाठी ऑक्सिजन आणायला गेलेल्या एक्स्प्रेसचा मुद्दामहून खोळंबा; शिवसेनेची टीका
हेच सल्ले महाराष्ट्र सरकारला का नाही दिले?
गेल्या वेळी महाराष्ट्राला करोनाचा सर्वाधिक फटका बसला होता. मग महाराष्ट्र या दुसऱ्या लाटेसाठी तयार का नाही राहू शकला? प्रियांका गांधी, राहुल गांधी आणि सोनिया गांधी सरकारला पत्र लिहून आणि पत्रकार परिषद घेऊन एक चित्र निर्माण करू पाहात आहेत. पण त्यांनी हेच सल्ले महाराष्ट्र सरकारला का नाही दिले, अशी विचारणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
भारतीयांना प्राधान्य का दिले नाही? रेमडेसिवीर, कोरोना लस निर्यातीवरून प्रियंका गांधी कडाडल्या
दरम्यान, जेव्हा देशाच्या कानाकोपऱ्यातून रेमडेसिवीरची मागणी होत आहे. जीव वाचविण्यासाठी रेमडेसिवीर मिळावे, म्हणून लोक प्रयत्नांची पराकाष्टा करत आहेत. अशा वेळी, एका महत्त्वाच्या पदावर राहिलेल्या भाजपच्या नेत्याने रेमडेसेवीरची साठेबाजी करणे, मानवतेविरुद्ध आहे, अशी टीका प्रियांका गांधी यांनी केली होती.