मुंबई: आताच्या घडीला राज्यसभा (Rajya Sabha Election 2022) निवडणुकीवरून देशातील राजकारण तापल्याचे दिसत आहे. अनेक नेते राज्यसभा निवडणुकीकडे डोळे लावून बसले होते. मात्र, काहींच्या पदरी निराशा पडल्याचे दिसत आहे. काँग्रेसमधून अशा पद्धतीचे सूर उमटू लागल्याचे सांगितले जात आहे. राज्यातही राज्यसभा निवडणुकीवरून कलगीतुरा रंगत असल्याचे पाहायला मिळत आहे. यातच संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर घोडेबाजाराचा आरोप केला होता. याला भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रत्युत्तर देत, आम्हाला घोडेबाजार करायचा नाही. तुम्हाला घोडेबाजाराची इतकीच भीती असेल, तर तुमचा उमेदवार मागे घेऊन प्रश्नच मिटवून टाका, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
भाजपच्या पीयूष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांनी सोमवारी विधानभवनात जाऊन राज्यसभा निवडणुकीचा अर्ज भरला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी याबाबत स्पष्ट भूमिका मांडली. भाजपचे तिन्ही उमेदवार निवडून येतील, याची आम्हाला खात्री आहे. तुम्हाला घोडेबाजाराची भीती वाटत असेल तर तुम्ही उमेदवार मागे घ्या, म्हणजे घोडेबाजार होणार नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
आमचे तिन्ही उमेदवार महाराष्ट्रातील अन् राजकीयदृष्ट्या सक्रिय
आमचे तिन्ही उमेदवार महाराष्ट्रातील आहेत आणि राजकीयदृष्ट्या सक्रिय आहेत. राज्यातील सत्ताधारी पक्षाचे अनेक आमदार सद्सद्विवेकबुद्धी आम्हाला मतदान करतील. त्यामुळे आमचे तिन्ही उमेदवार निवडून येतील, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. यावेळी धनंजय महाडिक यांना निवडून कसे आणणार असा सवाल करण्यात आला. यावर, आम्ही राज्यसभा निवडणुकीत तिसरा उमेदवार उतरवला आहे, म्हणजे आम्ही काहीतरी विचार केला असेल. तिसरा उमेदवार कसा निवडून आणणार, याबाबत आम्ही स्ट्रॅटेजी ठरवली आहे. पण त्याबद्दल मीडियात चर्चा करायची नसते, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
दरम्यान, राज्यसभेच्या सहा जागांकरिता १० जूनला होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपने केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक आणि राज्याचे माजी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादीने माजी केंद्रीय मंत्री व ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांना पुन्हा संधी दिली आहे. काँग्रेसकडून उत्तर प्रदेशमधील नेते आणि सुप्रसिद्ध उर्दू कवी इम्रान प्रतापगढी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपने तिसरा उमेदवार दिल्याने ही निवडणूक चुरशीची होणार आहे. कोल्हापूरचे महाडिक यांना तिसरा उमेदवार म्हणून रिंगणात उतरविल्याने राज्यातील राज्यसभा निवडणुकीला वेगळा रंग चढणार आहे.