मुंबई: उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरीच्या (Lakhimpur Kheri Incident) निषेधार्थ महाराष्ट्रात सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारने 'महाराष्ट्र बंद' (Maharashtra Bandh) ची हाक दिली असून, राज्यभरात बंदला प्रतिसाद मिळत आहे. काही ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. तर काही ठिकाणी बंदला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. भाजपचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadnavis) महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला असून, लखीमपूर घटनेला जालियनवाला बाग म्हणताना मावळमध्ये गोळीबार झाला तेव्हा जालियनवाला बाग आठवले नाही का, अशी विचारणा करत शेतकऱ्यांना भाजपपासून दूर करतील असे त्यांचे दिवास्वप्न आहे, असे म्हणत फडणवीसांनी विरोधकांना टोला लगावला आहे.
कुणीतरी गाडीखाली चिरडले म्हणून इतरांना चिरडण्याचा अधिकार कुणाला मिळालेला नाही. ते जेवढे निंदनीय असेल तर त्याला समोर ठेवून असे काम होईल तर ते देखील तेवढेच निंदनीय आहे, अशी टीका करत अशा प्रकारचा बंद कसा काय पुकारला जाऊ शकतो. सर्वोच्च न्यायालयाने अशा प्रकारचे बंद केले जाऊ नयेत, असे म्हटले आहे. उच्च न्यायालयाला आवाहन करेन की, याबाबत सुओ मोटो दाखल करून घ्यावी, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते माध्यमांशी बोलत होते.
तेव्हा जालियनवाला बाग आठवल नाही का?
यावेळी लखीमपूर खेरीच्या घटनेची तुलना जालियनवाला बागशी केल्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. मावळमध्ये गोळीबार झाला तेव्हा जालियनवाला बाग आठवले नाही का? राजस्थानमध्ये चार दिवसापूर्वी शेतकऱ्यांना तुडवले गेले, काँग्रेस सरकारने बेछूट मारले, त्यावर का बोलत नाही? हे राजकीय वक्तव्य करत आहेत, पोळी भाजत आहेत, लखीमपूर घटनेमुळे शेतकऱ्यांना संपूर्ण भाजपपासून दूर करतील असे त्यांचे दिवास्वप्न आहे. पण शेतकऱ्यांवर खरा अन्याय यांनीच केलाय. मोदीजींनी शेतकरी सन्मान योजना आणली, त्यांनी का नाही आणली? शेतकरी यांच्यासोबत कधीही जाणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
नैतिकता असेल तर शेतकऱ्यांसाठी पॅकेज घोषित करतील
या सरकारला थोडी जरी नैतिकता असेल तरी महाराष्ट्रातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी एखादे पॅकेज घोषित करतील अन्यथा यांचा ढोंगीपण अजून उघड होईल. महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना एका नव्या पैशाची मदत हे सरकार करत नाही. महाराष्ट्रातील शेतकरी अभूतपूर्व संकटात आहे. हे सरकार आल्यापासून २ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. सरकारने बांधावर जाऊन २५ हजार आणि ५० हजाराच्या केलेल्या घोषणा हवेत विरल्या, कर्जमाफीच्या घोषणा हवेत विरल्या, मदतीच्या घोषणा हवेत विरल्या, वेगवेगळी संकटे आली, त्यावेळी केलेल्या मदतीच्या घोषणा हवेत विरल्या, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.