मुंबई - "महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात लबाड सरकार आज आम्हाला पाहायला मिळालं. ठाकरे सरकारचं नाव हे लबाड सरकार म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासात लिहिलं जाईल" असं म्हणत माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच सचिन वाझेंवरून देखील जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. कोणत्याही गुन्ह्यात आधी फाशी आणि नंतर तपास असं होऊ शकत नाही. सचिन वाझे (Sachin Vaze) हे जणू ओसामा बिन लादेन असल्याचं चित्र निर्माण केलं जातंय. हे चुकीचं आहे, असं राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. यावरून देखील फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
"सचिन वाझेंना वकिलाची गरज नाही, उद्धव ठाकरे हेच त्यांचे वकील" असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर घणाघात केला आहे. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे. "सचिन वाझेंना वकिलाची गरज नाही. सचिन वाझेंकरता उद्धव ठाकरे वकील आहेत. सचिन वाझेंना डिफेंड करण्याचं काम उद्धव ठाकरेंना करावं लागतं. त्यामुळे त्यांना आता दुसरा वकील नेमण्याची आवश्यकता मला वाटत नाही. ज्यांच्या विरुद्ध इतके पुरावे आहेत त्यांना मुख्यमंत्री डिफेंड करत आहेत. अधिवेशनात सत्तारुढ पक्ष उघडा पडला. वरच्या सभागृहात प्रविण दरेकर आणि खालच्या सभागृहात आमच्या टीमने सरकारला निरुत्तर केले आहे" असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
'ठाकरे सरकार' हे महाराष्ट्राच्या इतिहासातील 'लबाड सरकार'; देवेंद्र फडणवीस कडाडले
महाराष्ट्राच्या इतिहासात ठाकरे सरकार हे लबाड सरकार म्हणून ओळखलं जाणार आहे. राज्यात वीज कनेक्शन तोडण्यावर स्थगितीची घोषणा सरकारनं सभागृहात केली होती आणि आता सरकार त्यासाठी असमर्थ असल्याचं सांगत आहे. राज्याच्या जनतेच्या डोळ्यात सरळसरळ धूळफेक करण्याचं काम ठाकरे सरकारनं केलं आहे, अशी घणाघाती टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. फडणवीस यांनी यावेळी विविध मुद्द्यांवरुन महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरलं. "राज्यात महाविकास आघाडी सरकारची केवळ नौटंकी सुरू आहे. घोषणा करायच्या आणि नंतर त्यावर मागे फिरायचं यातून राज्यातील सामान्य जनता व शेतकरी भरडून निघत आहेत", असं फडणवीस म्हणाले.
सचिन वाझे हे जणू ओसामा बिन लादेन असल्याचं चित्र निर्माण केलं जातंय; मुख्यमंत्री ठाकरेंची टीका
मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी बोलत असताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्याच्या पोलीस यंत्रणेवर विश्वास ठेवायला हवा, असं म्हटलं. "राज्यात सध्या एखाद्याला टार्गेट करण्याची नवी पद्धत सुरू झालीय. एखाद्या प्रकरणाचा तपास पूर्ण होण्याआधीच त्याच्यावर बेछुट आरोप करुन त्याला बदनाम करायचं हे योग्य नाही. मनसुख हिरेन आणि मोहन डेलकर या दोन्ही प्रकरणांची सरकार अतिशय गंभीरपणे चौकशी करत आहे. तपास पूर्ण होऊ देत सारंकाही समोर येईल आणि दोषींवर कठोर कारवाई होईल", असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.