Devendra Fadnavis: काँग्रेसमधून निलंबित केलेले नेते आशिष देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेस, भाजप पुन्हा काँग्रेस असा प्रवास केलेल्या आशिष देशमुख यांनी आता पुन्हा भाजपात प्रवेश केला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली.
अडीच वर्षे मुख्यमंत्री घरातून बाहेरच पडले नाहीत. हे मी म्हणत नाही. शरद पवार यांच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आत्मचरित्रात लिहिले आहे. ‘अडीच वर्षाच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दोनच वेळा मंत्रालयात गेले. यामुळे आमचं मोठं नुकसान झाले आहे. उद्धव ठाकरेंना राजकीय समज कमी आहे,’ असेही शरद पवारांनी पुस्तकात सांगितले आहे, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली.
भाजप-शिवसेना युतीच्या पाठिशी जनता उभी राहील
महाराष्ट्रात तीन पक्ष एकत्र आले आहेत. त्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिल्लक सेना आहे. ती शिल्लक सेनाच आहे. खरी शिवसेना आपल्याकडे आहे. हे तीनही पक्ष एकत्रित आले, तरीही भाजपा-शिवसेना युतीच्या पाठिशी जनता उभी राहील. कारण, अडीच वर्षाचा कारभार जनतेने पाहिला आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
दरम्यान, शरद पवारांनी ज्यांच्याबद्दल दोन-तीन पाने लिहून ठेवली आहेत. त्यांच्या नेतृत्वात हे वज्रमूठ सभा घेत आहेत. वज्रमूठ सभेत हे भाषण देत आहेत. भाषण झाल्यावर काँग्रेस-राष्ट्रवादीवाले म्हणतात यांच्याकडे दहा लोकही नाहीत. आपण लोक आणायची आणि हात दाखवत भाषण करायची. त्यापेक्षा वज्रमूठ बंद करा. म्हणून वज्रमूठ सभा आता बंद झालेल्या आहेत. वज्रमूठीला इतके तडे गेले आहेत की वज्राचे काम करू शकत नाही, या शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी हल्लाबोल केला.