उद्धव ठाकरे यांनी मोठा गौप्यस्फोट केला. आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून घडवेन अन् दिल्लीला जाईन असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटल्याचं सांगितलं आहे. तसेच "माझा एकापेक्षा जास्त वेळा विश्वासघात झाला. माझ्या दृष्टीने भाजपाचा खरा चेहरा उघड झाला आहे" असंही म्हटलं. याच दरम्यान आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या गौप्यस्फोटावर जोरदार पलटवार केला आहे. "जशास तसे उत्तर दिले जाईल" असं म्हणत निशाणा साधला आहे.
"दररोज एकेक कपोलकल्पित कथानक तयार करुन कुणाची दिशाभूल करता? स्वत:चीच ना?" असा सवाल देखील विचारला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "हिंदूह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आम्ही आदर केला, करतो आणि करीत राहू. पण, ज्यांनी वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे विचार त्यागले, त्यांचा आदर आम्ही करु शकत नाही."
"हिंदूह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख शब्दांचे पक्के होते आणि कधीच मागे हटत नव्हते. दिलेला प्रत्येक शब्द ते पाळायचे. संकुचित वृत्तीने त्यांनी कधीही स्वार्थाचा विचार केला नाही आणि त्यांच्या हयातभर खोटारडेपणा तर कधीच केला नाही. म्हणूनच ते आजही आमच्यासाठी वंदनीय आहेत."
"दररोज एकेक कपोलकल्पित कथानक तयार करुन कुणाची दिशाभूल करता? स्वत:चीच ना? महाराष्ट्राचे समाजकारण आणि महाराष्ट्राचा विकास ही काही सलिम-जावेदची स्क्रिप्ट नाही. समाजकारणाचा आणि विकासाचा तुम्हाला गंध नसला तरी उगाच अशा स्क्रीप्ट तयार करण्याच्या भानगडीत पडू नका. जशास तसे उत्तर दिले जाईल!" असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
राम मंदिर भाजपाने बांधलेलं नाही; हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंचा 'रामबाण
हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. यासोबत त्यांनी भाजपाने राम मंदिर बांधलं नसल्याचं म्हटलं आहे. "भाजपाने आधी रोजी-रोटीबद्दल बोलायला हवं. शेतकरी-महिला-गरीब-तरुण या मुद्द्यावर की हिंदुत्वाच्या मुद्द्यावर... ते कोणत्या मुद्द्यावर लढत आहेत हे त्यांनी सांगावं? राम मंदिर भाजपाने बांधलेलं नाही, हा न्यायालयाचा निर्णय होता."
"बाबरी मशीद पाडण्याची जबाबदारी शिवसेनेने घेतली, मुख्यमंत्री म्हणून मी विधानसभेत हिंदुत्वावर बोललो आहे. लोकांना ते माहीत आहे. पण आज माझ्यासाठी सर्वात मोठा मुद्दा हा आहे की, मला मोदी सरकार नाही तर भारत सरकार हवं आहे. जर एकच पक्ष असेल तर ते देशासाठी सर्वात धोकादायक आहे" असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.