मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी विद्यमान आमदार हे पुन्हा आपल्यालाच पक्षाची उमेदवारी मिळावी यासाठी फिल्डिंग लावताना दिसत आहे. मात्र उमरखेडविधानसभा मतदारसंघाचे भाजपचे विद्यमान आमदार राजेंद नजरधने यांना आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी मोठी अडचणीचा सामना करावा लागत आहे. कधीकाळी पक्षातील विरोधक आता जिल्हाध्यक्ष झाल्याने नजरधने यांची चिंता वाढली आहे. तर नुकतेच भाजपचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष झालेल्या नितीन भुतडा यांचे कट्टर समर्थक असलेले उमरखेडचे नगराध्यक्ष नामदेव ससाने यांनी उमेदवारीसाठी प्रयत्न सुरु केले असल्याने आमदार नजरधनेंच्या अडचणी वाढल्या आहे.
यवतमाळ जिल्ह्याचे नुकतेच जिल्हाध्यक्ष पदी निवड झालेले नितीन भुतडा आणि उमरखेडचे आमदार राजेंद नजरधने यांच्यातील मतभेद काही नवीन नाहीत. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी उमरखेडमध्ये झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमात नजरधने आणि भुतडा यांच्यातील मतभेद चर्चेचा विषया बनला होता. आता नुकतेच भुतडा यांची भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे . त्यांनतर आता उमरखेड मतदारसंघात राजकीय बदलाचे समीकरणे वाहू लगले असल्याचे पाहायला मिळत आहे.
नजरधने यांच्याशी झालेल्या मतभेदांमुळे भुतडा यांनी आपली रसद ससाने यांच्या मागे उभी केली आहे. तर ससाणे यांनी सुद्धा विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. 'नितीनभाऊ का आशीर्वाद' म्हणत ससाने कामाला लागले आहे. त्यातच भुतडा यांचा पक्षात वजन आहे. थेट वर्षापर्यंत त्यांचे सलोख्याचे संबध आहेत. त्यामुळे आमदार नजरधने आणि भुतडा यांच्यातील वाढलेला बेबनाव पाहता नजरधने यांचा पत्ता कापण्यात येते की काय अशी चर्चा मतदारसंघात सुरू आहे. तर खुद्द नजरधने यांचीसुद्धा चिंता वाढली आहे.
ससाने हे जिल्हाध्यक्ष भुतडा यांचे कट्टर समर्थक समजले जातात. त्यातच आता ससाने यांनी सुद्धा मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरु केली आहे. त्यामुळे नजरधने गटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आगामी काळात उमरखेडमध्ये राजकीय बदल होण्याची शक्यता असल्याची चर्चा तालुक्यात सुरु आहे.