अहमदनगर : भारतीय जनता पार्टीच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी झालेली निवड बेकायदेशीर असल्याचा आरोप करीत पक्ष कार्यालयात कार्यकर्ते रविवारी एकमेकांवर धावले. हमरीतुमरीवर आलेले कार्यकर्ते एकमेकांना मारहाण करण्यासाठी तुटून पडले होते.पालकमंत्री राम शिंदे यांच्या समोर हा गोंधळ सुरू होता. गोंधळ शांत झाल्यानंतर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी प्रा. भानुदास बेरड यांची निवड झाल्याची घोषणा निवडणूक अधिकारी खा. अमर साबळे यांनी केली. खा. साबळे यांच्या अध्यक्षतेखाली भाजपा कार्यालयात रविवारी दुपारी झालेल्या बैठकीला प्रदेश संघटन मंत्री किशोर काळकर, राम शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील चार आमदार व इतर पदाधिकारी उपस्थित होते.जिल्हाध्यक्षपदाची घोषणा करण्यासाठी साबळे उभे राहताच भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक गर्जे (पाथर्डी) हे पक्षाच्या घटनेची प्रत घेऊन बोलण्यासाठी उभे राहिले. माझी घोषणा झाल्यानंतर बोला, असे साबळे त्यांना सांगत होते, तर गर्जे हे आधी बोलण्याची संधी द्या, असे म्हणत होते. गर्जे यांना खाली बसविण्यासाठी बैठकीत एकच गदारोळ झाला. त्यावर ‘पक्ष हा सध्या भाड्याने दिला आहे. बाहेरच्या लोकांनाच सगळी पदे वाटली जात आहेत. निष्ठावंतांचा साधा विचारही घेतला जात नाही’, असा आरोप प्रा. सुनील पाखरे यांनी केला. त्यावर कार्यकर्ते संतप्त झाले. त्यावर पालकमंत्र्यांनी पाखरे यांना समज दिली. मात्र संतप्त कार्यकर्ते पाखरे यांच्यावरच तुटून पडले. त्यांना मारहाण करण्यापर्यंत अनेकजण धावले होते. (प्रतिनिधी)
भाजपा जिल्हाध्यक्षांच्या निवडीवरून हमरीतुमरी!
By admin | Published: February 29, 2016 4:28 AM