मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांना भाजपाने राज्यसभेवर पाठविण्याची तयारी दर्शविली आहे. राणे यांनी काल रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत नवी दिल्लीत भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली. त्यावेळी शहांनी त्यांना राज्यसभेची आॅफर दिली.शहा यांच्या निवासस्थानी या तिघांमध्ये तासभर चर्चा झली. त्यावेळी काँग्रेसचे आमदार असलेले नितेश राणे आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशीष शेलार हेही उपस्थित होते. नितेश यांनी मात्र सदर बैठकीस उपस्थित असल्याचा इन्कार केला आहे.भाजपाने राणेंना खासदारकी देऊ केल्याने त्यांना राज्यात मंत्रिपद देण्याचा विषय आता भाजपाकडून बंद करण्यात आल्याचे मानले जात आहे. फडणवीस सरकारमध्ये उर्वरित एक वर्षासाठी मंत्रिपद मिळण्याचा आग्रह धरण्याऐवजी राज्यसभेची सहा वर्षांसाठीची खासदारकी स्वीकारण्याचा पर्याय राणे निवडू शकतात, असे म्हटले जाते.स्वत: राणे यांनी त्यांना भाजपाकडून खासदारकीची आॅफर असल्याचे स्पष्ट केले. शहा यांना भेटून परतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी, मंत्रिपद किंवा खासदारकी हे दोन्ही पर्याय खुले असल्याचा दावा केला. ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी मला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात समावेश करण्याबाबतचा शब्द दिला आहे. मात्र यासाठी विलंब का होत आहे, याची मला कल्पना नाही. त्याबाबत मुख्यमंत्रीच सांगू शकतील. काही गोष्टींबाबत चर्चा सुरु आहे. त्यामुळे थांबू शकत नसाल तर राज्यसभेवर पाठवू, अशी आॅफर भाजपने दिली आहे. मात्र महाराष्ट्रात मंत्री की राज्यसभा याबाबतचा निर्णय विचार करुन कळवू, असं मी त्यांना सांगितलं आहे.मंत्रिपदाच्या आड शिवसेनेचा विरोध हे कारण असल्याचे आपल्याला वाटते का या प्रश्नात राणे म्हणाले, की त्याबाबतचा सर्वस्वी निर्णय मुख्यमंत्री घेणार आहेत, त्यामुळे शिवसेनेच्या पोकळ धमकीला मुख्यमंत्री घाबरणार नाहीत.नारायण राणे यांचा पक्ष हा एनडीएचा घटक पक्ष आहे. या पक्षाची लोकसभा निवडणुकीत काय भूमिका असेल या बाबत भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या बरोबरच्या भेटीत चर्चा झाली एवढीच प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकमतशी बोलताना दिली.
भाजपाकडून राणेंना राज्यसभेची आॅफर, राज्यात मंत्रिपदाची संधी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2018 4:09 AM