मुंबई : शिवसेना सरकारमधून बाहेर पडल्यास राज्यात पुन्हा सरकार स्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपाला पाठिंबा देणार नाही, आत्ता या पत्रकार परिषदेत आपण ही गोष्ट पक्षाच्या लेटरपॅडवर लिहून देण्यास तयार आहोत, लिहिलेले ते पत्र आपण राज्यपालांनाही देऊ. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही तशी भूमिका घ्यावी; आणि या निवडणुकीनंतर त्यांनीही भाजपा सरकारला पाठिंबा देऊ नये, असा फुल टॉस राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत टाकला.राज्यात होत असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवारांनी भाजपा, शिवसेनेला अनेक फटके मारले. उत्तर प्रदेश निवडणूक जाहीरनाम्यात शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची भूमिका भाजपाने घेतली आहे, तीच भूमिका जर राज्यात फडणवीस यांनी घेतली तर आपण या सरकारला बिनशर्त पाठिंबा देऊ, असे वक्तव्य करून उद्धव ठाकरे यांनी सरकारमध्ये कायम राहण्याचा मार्ग तयार करून ठेवला आहे. पण आपली भूमिका स्पष्ट आहे; आणि ती आपण लिहून देण्यासही तयार आहोत, असे पवार म्हणाले.पवार म्हणाले, सध्या शिवसेना व भाजपा या दोन्ही पक्षांतील नेत्यांमध्ये ज्या पद्धतीने खालच्या पातळीवर जाऊन आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत ते पाहता सरकार कधीही अस्थिर होऊ शकते. परंतु एकीकडे शिवसेना सरकारमधून बाहेर पडण्याची भाषा करीत असतानाच दुसरीकडे कर्जमाफी केली तर भाजपा सरकार पाच वर्षे चालू शकते, असे सांगत आहे. आता भाजपाला राज्यातील सरकार वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करण्याशिवाय पर्याय नाही, असा टोलाही पवारांनी लगावला. महाराष्ट्रातील सरकार घालविण्यापेक्षा, पुन्हा निवडणुकीवर व जाहिरातींवर हजारो कोटींचा खर्च करण्यापेक्षा तसेच शिवसेना पक्ष प्रमुखांच्या प्रकृतीचा विचार करता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करणे कधीही चांगले, असा चिमटाही पवार यांनी दोन्ही पक्षांना लगावला.या आधी तुम्हीच भाजपाला न मागता पाठिंबा देऊ केला होता, तो कशासाठी? शिवाय विरोधकांची जागाही शिवसेनेने घेतली. ती जागा देखील तुमच्या पक्षाला मिळवता आली नाही असे का झाले?, असा सवाल केला असता ते म्हणाले, राज्यात विधानसभेच्या निवडणुका सगळेच पक्ष वेगवेगळे लढले होते. कोणालाही स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. पुन्हा निवडणुका घेणे राज्याच्या हिताचे नव्हते. शिवाय भाजपाचे सरकार होऊ दिले नसते तर आम्ही त्यांना संधी मिळू दिली नाही, असाही आरोप झाला असता, म्हणून त्यावेळी सरकार स्थिर रहावे यासाठी मी ती भूमिका घेतली होती. आमच्या पक्षाच्या सगळ््या नेत्यांनी एकत्रित बसून धोरणात्मक निर्णय घेतला होता. त्यांना संधी दिली पाहिजे. म्हणून आम्ही गप्प बसलो. आता दोन अडीच वर्षांत जनतेला भाजपाचे खायचे आणि दाखवायचे दात कळाले आहेत. शिवसेना आणि भाजपाचे एकमेकांवर किती घनिष्ठ प्रेम आहे. हे त्या दोघांना आणि राज्यातील जनतेलाही कळाले आहे. त्यामुळे आता राज्यात निवडणुका घेण्यास चांगले वातावरण आहे, असेही पवार म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)
भाजपाला पाठिंबा नाही, लिहून देतो!
By admin | Published: February 19, 2017 5:18 AM