मुंबई : शिवसेना आणि भाजपामधील राजकीय अंडर स्टॅण्डिंगमुळे महापालिकेच्या प्रभाग समित्यांची निवडणूक बिनविरोधच पार पडत आहे. १७पैकी मंगळवारी झालेल्या आठ प्रभागांच्या निवडणुकीत भाजपाकडे पाच तर शिवसेनेकडे तीन प्रभाग समित्यांचे अध्यक्षपद आले आहे. केवळ ए, बी आणि ई या प्रभागात झालेल्या निवडणुकीत भाजपा समर्थक अखिल भारतीय सेनेच्या नगरसेविका गीता गवळी यांनी अवघ्या एक मताधिक्याने काँग्रेसच्या जावेद जुनेजा यांचा पराभव केला.महापालिका निवडणुकीत स्वबळावर मोठे यश मिळविल्यानंतरही महापौरपदाचा हक्क सोडणाऱ्या भाजपाने प्रभाग समितीसाठी मात्र शिवसेनेबरोबर हातमिळवणी केली आहे. त्यानुसार पाच वर्षांमध्ये पहिल्या वर्षी शिवसेनेकडे आठ तर भाजपाकडे नऊ आणि दुसऱ्या वर्षी शिवसेनेकडे नऊ तर भाजपाकडे आठ प्रभाग समित्यांचे अध्यक्षपद असणार आहे. १७पैकी आठ प्रभाग समिती अध्यक्षपदांसाठी मंगळवारी झालेल्या निवडणुकांमध्ये सात प्रभागांत अध्यक्षांची निवड बिनविरोध झाली. यामध्ये ए/बी/ई, सी/डी, पी दक्षिण, पी उत्तर, आर दक्षिण या पाच प्रभाग समित्यांमध्ये भाजपाचे नगरसेवक अध्यक्ष झाले आहेत. एफ उत्तर /एफ दक्षिण, जी दक्षिण आणि आर उत्तर/ आर मध्य हे तीन प्रभाग शिवसेनेकडे आहेत. ए, बी, ई या प्रभागात अभासेच्या नगरसेविका गीता गवळी यांना भाजपाने समर्थन केले आहे. त्यांना भाजपा व शिवसेनेची प्रत्येकी तीन अशी सहा मते मिळाली. तर काँग्रेसचे जावेद जुनेजा यांना पाच मते मिळाल्याने गवळी विजयी ठरल्या. (प्रतिनिधी)
प्रभाग समित्यांवर भाजपाचे वर्चस्व
By admin | Published: March 22, 2017 1:44 AM