मुंबई : आपल्या अर्वाच्च आणि अश्लाघ्य भाषेमुळे अंधेरीतील भाजपा आमदार अमित साटम यांनी आपल्या पक्षाचा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा खरा चेहराच उघडा पाडला आहे. पालिका अभियंत्यांवर अत्यंत खालच्या भाषेत तोंडसुख घेणाऱ्या साटम यांच्यामुळे संसदीय राजकारणालाच काळिमा फासण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. तर, आक्रमकतेच्या नावाखाली साटम यांच्या आक्रस्ताळेपणामुळे पक्ष आणि संघाला नाहक बदनामी सहन करावी लागत असल्याची प्रतिक्रिया भाजपातून व्यक्त होत आहे. साटम यांच्या आॅडिओ क्लिपमुळे विधी मंडळ अधिवेशन संपल्यानंतरही राजकीय वातावरण चांगलेच तापले.आपला फोन उचलला नाही आणि एसएमएसला उत्तर दिले नाही, म्हणून भाजपा आमदार अमित साटम मुंबई महापालिकेच्या अभियंत्याला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत असल्याची आॅडिओ क्लिप शुक्रवारी सोशल मीडियात ‘व्हायरल’ झाली. साटम यांनी क्लिपमधील आवाज आपला नसल्याचा दावा केला.मात्र, केवळ दोनदा फोन उचलला नाही म्हणून अत्यंत खालच्या पातळीवर अभियंत्यांवर तोंडसुख घेण्याचा प्रकार घृणास्पद आहे. साटम यांच्या वर्तनामुळे भाजपाचा खरा चेहरा आणि चरित्र उघडे झाले.संस्काराच्या गप्पा मारणाºया संघात स्वयंसेवकांना अशीच भाषा शिकविली जाते का, असा सवाल मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला आहे. यापूर्वीही साटम यांनी अशा प्रकारे शिवीगाळ, मारहाण केल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. त्यामुळे क्लिपवरच प्रश्नचिन्ह उचलण्याचा साटम यांचा प्रयत्न हास्यास्पद आहे. साटम हे सत्ताधारी पक्षातील आहेत. पोलीस आणि सर्व यंत्रणा त्यांच्या दिमतीला आहेत. त्यामुळे आरोप करण्यापेक्षा साटम यांनी सत्य बाहेर आणावे, असे आव्हानही निरुपम यांनी दिले. साटम यांचा पूर्व इतिहास पाहता क्लिप खरी असल्याचेच जाणवते, असेही निरुपम म्हणाले.‘तो’ आवाज माझा नाही - साटम‘या आॅडिओतील आवाज माझा नाही,’ असा दावा आमदार अमित साटम करीत आहेत. सुरुवातीचा आवाज आपला असून नंतरच्या आवाजात छेडछाड करून बनावट क्लिप बनवल्याचे साटम सांगत आहेत. तथापि, या आॅडिओ क्लिपमधील संपूर्ण आवाज हा अमित साटम यांचाच आहे, अशी चर्चा सर्वसामान्यांत दिवसभर रंगली होती. साटम यांच्या क्लिपवर भाजपाकडून कोणतीच प्रतिक्रिया आली नाही. मात्र, आक्रमकतेच्या नावाखाली आक्रस्ताळेपणा सुरू आहे. एखादा प्रश्न सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधींकडे विविध वैध मार्ग उपलब्ध आहेत. मात्र, शिवीगाळ, मारहाणीच्या या घटनांमुळे पक्षाची बदनामी होत असल्याची भीती मुंबई भाजपातील एका वरिष्ठ पदाधिकाºयाने व्यक्त केली.यापूर्वीही साटम यांनी असे प्रकार केले आहेत. शुक्रवारी उघड झालेल्या क्लिपमुळे विनाकरण संघाला टीकेचा सामना करावा लागत असल्याचेही या पदाधिकाºयाने सांगितले.
साटम यांच्यामुळे भाजपा, संघाचा खरा चेहरा उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 5:45 AM