- अतुल कुलकर्णी, मुंबई
मंत्रीमंडळाचा विस्तारावरुन भाजपा शिवसेनेतील अंतर्गत राजकारण ढवळून निघाले असून एकमेकांना शह-काटशह देण्याच्या खेळीमुळे विस्ताराचा विषय लटकला आहे. त्यातच शिवसेनेने सरकार विरोधी भूमिका कायम ठेवल्याने होणारा विस्तार सेनेशिवाय करायचा का,याचीही चाचपणी पक्षात जोरात सुरु झाली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परदेश दौऱ्यावर असताना सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील कोल्हापूरात पत्रकार परिषद घेऊन विस्तार होणार, असे जाहीर केले. त्यापाठोपाठ प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनीही मंत्रिमंडळ विस्ताराची घोषणा करुन टाकली. या प्रकाराने मुख्यमंत्री नाराज झाले. आपली नाराजी बोलून न दाखवता फडणवीस यांनी चंद्रकांत पाटील यांचा २७ तारखेचा आणि दानवेंचा ३० तारखेचा मूहुर्त चुकवला. मंत्रिमंडळ विस्ताराची घोषणा हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा निर्णय असताना एखादा कॅबिनेट मंत्री कितीही कोणाच्याही जवळचा असला तरीही परस्पर असा निर्णय कसा काय जाहीर करु शकतो, अशी नाराजी मुख्यमंत्र्यांनी दिल्लीच्या कानी घातल्याचे सांगण्यात आले.हे घडत असताना मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेशी जूळवून घेण्यासाठी दिल्लीच्या नेत्यांना राजी केले होते. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांच्या निकालाची पार्श्वभूमी त्याला होती. यापुढे आपण शिवसेनेशी पूर्वीसारखेच चांगले संबंध ठेवावेत यावर दिल्लीही तयार झाली; मात्र शिवसेनेने मराठवाड्याचा दौरा करताना पुन्हा एकदा राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले. सत्तेत राहून विरोधकांची भूमिका बजावण्याचे काम शिवसेनेने चालूच ठेवले. त्यामुळे पुन्हा एकदा भाजपाला आपली स्ट्रॅटेजी बदलणे भाग पडल्याचे भाजपाच्या एका ज्येष्ठ मंत्र्याने लोकमतशी बोलताना सांगितले. मंत्रीमंडळ विस्तारात शिवसेनेला दोन राज्यमंत्री पदे मिळणार आहेत. त्याचा तसाही फारसा फायदा नाही त्यामुळे आपण जनतेच्या बाजूने आहोत हे दाखवण्याचे काम चालूच ठेवण्याची भूमिका सेनेने घेतली आहे. परिणामी मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याचेही तो मंत्री म्हणाला.शिवसेनेने एकनाथ खडसेंचे कट्टर विरोधक गुलाबराव पाटील यांना मंत्री करण्याचे घाटल्याने खडसे देखील विस्तार कसा टाळता येईल याच्या प्रयत्नात असल्याचे शिवसेनेचे म्हणणे आहे. शिवसेनेने प्रताप पाटील चिखलीकर आणि सुचित मिंचेकर अशा दोघांची नावे निश्चित केल्याचे समजते. मुंबई महापालिका निवडणुका होईपर्यंत शिवसेना असेच वागत राहील हे लक्षात घेऊन भाजपाने काँग्रेसच्या एका गटाशी संपर्क सुरु ठेवला आहे. राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांच्यासोबत किती जण वेगळा गट करु शकतात, याचीही शक्यता आतापासूनच पडताळून पाहीली जात आहे. मुख्यमंत्र्यांना शिवसेनेशी जूळवून घ्यावे वाटत असताना हे चालू आहे हे विशेष. मंत्रिपदावरून अंतर्गत कलह शिगेलादुसरीकडे भाजपात मंत्रीपदावरुन अंतर्गत कलह शिगेला गेला आहे. चैनसुख संचेती, भाऊसाहेब फुंडकर, संजय कुटे यांच्यातील वाद कसा मिटवायचा हा यक्ष प्रश्न पक्षापुढे आहे. काही विद्यमान मंत्र्यांना आपल्या खात्यांमध्ये बदल हवा आहे. हा वादही सध्या पक्षात स्फोटाचा विषय बनू शकतो. दानवे पडद्याआड राहून विस्तार कसा होईल यासाठी प्रयत्नरत आहेत. काही करुन त्यांना मानणारे मंत्री त्यांना आणायचे आहेत. या सगळ्या वादावादीत शनिवारपर्यंत काय घडते याकडे दोन्ही पक्षांचे आमदार डोळे लावून बसले आहेत.