- राजू इनामदार - पुणे: लोकसभेच्या निवडणुकीचे वातावरण काँग्रेससाठी थोड अनुकूल होत असतानाच सर्जिकल स्ट्राईक झाले आणि काँग्रेस पुन्हा बॅकफूटवर गेली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना मात्र हे मान्य नाही. शेती व बेरोजगारी या दोन्ही महत्वांच्या मुद्द्यांवर सत्ताधारी भाजपाला अपयश आले असून तेच काँग्रेस ठळकपणे निवडणूकीत मांडणार आहे असे ते म्हणाले. पक्षाध्यक्ष राहूल गांधी यांच्यात वातावरण पुन्हा फिरवण्याची ताकद असल्याचा विश्वास व्यक्त करतानाच त्यांनी राफेल विमानखरेदीतील भ्रष्टाचार भाजपाला या निवडणुकीत धूळ चारणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राफेलसह अनेक विषयांवरचे मौन पुरेसे बोलके असून ते मतदारांपर्यंत काँग्रेस पोहचवेल असे त्यांनी ‘लोकमत’ बरोबर बोलताना स्पष्ट केले.
# येत्या निवडणुकीत काँग्रेस सक्षमपणे लढत देईल असे तुम्हाला खरोखरच वाटते का? संघटनात्मक स्तरावर काँग्रेसची शक्ती क्षीण झाल्याचे उघड दिसत असतानाही काँग्रेस कशाच्या बळावर सामना करणार आहे? -: काँग्रेस हा देशातील सर्वात जुना तसेच सर्वाधिक काळ सत्तेवर राहिलेला पक्ष आहे. पराभव काँग्रेसला नवीन नाही. यापूर्वीही काँग्रेसने पराभवाचा सामना केला आहे. त्यामुळे या निवडणूकीत संघटना स्तरावर काँग्रेस क्षीण दिसत असली तर पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्यामुळे पक्ष पु्न्हा गतिमान होईल यात शंका नाही. त्यांनी मांडलेले मुद्दे देशात चचेर्ला येतील. त्यावर भाजपाला उत्तर द्यावेच लागेल. त्यात शेती, बेरोजगारी व राफेलही असणारच आहे. शेती व बेरोजगारी या दोन मुद्द्यावर सत्ताधारी भाजपाला पुर्ण अपयश आले आहे. देशातील बेरोजगारीचे प्रमाण कितीतरी वाढले आहे. ग्रामीण भागात शेतकºयांची काय स्थिती आहे हे भाजपाला कधीही समजणार नाही. हेच दोन प्रमुख मुद्दे काँग्रेसचे असतील व त्याला भाजपाला कधीही उत्तर देता येणार नाही. छत्तीसगडमध्ये आमचा कोणी नेता नव्हता. सगळे नेते त्यांनी गायब केले होते, मात्र तरीही आम्हाला विजय मिळाला. देशात रोष आहे, मात्र तो दिसत नाही हे खरे आहे व काँग्रेसला त्याचा उपयोग होणार आहे. # राफेलच्या मुद्द्याला जनतेत फारसा प्रतिसाद मिळालेला नाही असे दिसत असताना काँग्रेस त्याचभोवती का घुटमळत आहे?-: राफेल ता खरेदी व्यवहार थोडा क्लिष्ट आहे. त्यात नक्की काय झाले ते काँग्रेस जनतेसमोर नेत आहे. हा मुद्दा चालत नाही हे माध्यमांना वाटते, कारण त्यांना तो पुढे आणण्यात काही अडचणी असतील, मला त्यावर बोलायचे नाही, मात्र जनतेला सगळे समजते. या विमानखरेदीला विलंब का केला गेला, त्यात दलाल शोधण्यात कोणी वेळ घालवला, कोणाला किती करोड दिले या सर्व गोष्टी जनतेपर्यंत बरोबर पोहचल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी या विषयावर बोलायलाही तयार नाहीत यावरूनच त्यात काय झाले असेल ते स्पष्ट दिसते. शेती व बेराजगारीच्या मुद्द्याला काँग्रेस राफेल खरेदीचीही जोड देणार आहे. # सर्जिकल स्ट्राईकनंतरही काँग्रेस यशस्वीपणे पुढे येईल का?--- खरे सांगायचे तर काँग्रेसने सर्जिकल स्ट्राईकवर फार संयम बाळगला आहे. आम्ही कधीही त्याबाबत बोललो नाहीत, मात्र आता फार काळ संयम बाळगता येणार नाही असे वाटते. कारण पंतप्रधान आता राफेल चा मुद्दा काढून याचा राजकारणासाठी वापर करू लागले आहेत. मोदी यांचे राफेल असते तर वेगळा निकाल लागला असता हे वक्तव्य चुकीचे व सैन्यदलाचा अपमान करणारे आहे. मीग २१ पाठवण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला होता का? तो निर्णय तुमचाच होता तर आता जबाबदारी का नाकारत आहात? पाकिस्तान म्हणत आहे की आम्ही त्यांचा हवाई हल्ला परतून लावला. मोदी यांच्या अशा वक्तव्यामुळे त्यावर शिक्कामोर्तबच होत आहे. काँग्रेसला यातील असे अनेक मुद्दे पुढे आणावे लागतील व ते आणले जातील. त्यामुळे सर्जिकल स्ट्राईकचा त्यांना फायदा होईल असे काही वाटत नाही. यात राजकारण करू नका असे ते म्हणत आहेत व तेच सर्वात जास्त वापर करत आहेत.# संघटना म्हणून काँग्रेस क्षीण झाली आहे, जनतेत रोष असेल तर तो शिडात भरून घ्यायला काँग्रेस कमी पडत आहे असे तुम्हाला वाटते का?-- मी असे म्हणणार नाही. पण सन २०१४ च्या निवडणूकांमध्ये आमचे खूप नुकसान झाले. त्यानंतर आमच्या अनेक उमेदवारांना त्यांनी पळवले. त्यातून संघटन कमी झाले. आता तसे होणार नाही. काही मुद्दे आहेत, पण निवणुकीत त्यांचा फारसा परिणाम आमच्यावर होणार नाही असे वाटते.# प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर आघाडी होणार की नाही?---राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत त्यांनी आमच्यासंदर्भात काय शोध लावला आहे त्यांनाच ठाऊक! वास्तविक काँग्रेसने आरएसएसबाबत कायम विरोधी निर्णय घेतले आहेत. सरदार पटेल यांनी तर संघावर बंदी घातली होती. त्यानंतरही काँग्रेसने एकदोन वेळा बंदी घातली आहे. आंबेडकर यांनी प्रस्ताव तयार करावा आम्ही त्यावर डोळे झाकून स्वाक्षरी करतो असे आम्ही सांगितले आहे. आता निर्णय त्यांनी करायचा आहे. आमचे काही फार नुकसान होणार नाही. दलित मते तिकडे वळलेली दिसतात, मात्र नेता नसल्यामुळे तशी स्थिती आली आहे. दुसरे असे की त्यांच्या सभांना होणारी गर्दी कशी आहे ते त्यांनाच माहिती. एक सभा घ्यायची तर त्याला लाखो रुपए लागतात. हा खर्च कोण करतो आहे हा प्रश्न आहे. आम्ही प्रस्ताव दिलेला आहे. आता निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. ----------------------------------------पुण्यातून लढण्याचा विचार नाही -+ तुम्हाला लोकसभेत जाण्यासाठी आग्रह केला जातो यामागे काय आहे या प्रश्नाला चव्हाण यांनी पक्षात काही लोक असे आहेत म्हणत हसून बगल दिली. पुण्यातून निवडणूक लढवण्याचा काही प्रश्नच नाही. माझे इथे राजकीय, सामाजिक किंवा व्यावसायिक असे कसलेच काम नाही. त्यामुळे पक्षही असे काही सांगणार नाही असे ते म्हणाले. .....................