भाजपाची पहिली यादी लवकरच?; 'इतक्या' जागांच्या उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2024 10:13 PM2024-08-07T22:13:41+5:302024-08-07T22:15:44+5:30

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा महिनाभरात होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी राज्यात नेत्यांच्या गाठीभेटी, दौरे, यात्रा सुरू झाल्या आहेत. 

BJP first list of 30-40 candidates for maharashtra assembly elections will be announced soon?  | भाजपाची पहिली यादी लवकरच?; 'इतक्या' जागांच्या उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता

भाजपाची पहिली यादी लवकरच?; 'इतक्या' जागांच्या उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता

नवी दिल्ली - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आलेला आहे. महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत राजकीय नेत्यांच्या बैठका सुरू आहेत. एकीकडे उद्धव ठाकरे दिल्लीत गाठीभेटी घेत आहेत तर भाजपानेही रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. पुढील काही महिन्यात महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड इथं विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यात भाजपाच्या पहिल्या यादीबाबत नवीन अपडेट समोर आली आहे.

सूत्रांनुसार, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखेची घोषणा होण्यापूर्वीच भाजपा त्यांच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार आहेत. या यादीत भाजपा जवळपास ३०-४० उमेदवारांच्या नावांची घोषणा करू शकते. भाजपा पहिल्या यादीत अशा उमेदवारांच्या नावाची घोषणा करू शकते ज्याठिकाणी मागील निवडणुकीत भाजपाला पराभवाचा  सामना करावा लागला किंवा कमी मताधिक्याने या जागा जिंकल्या. भाजपा ज्या जागांवर उमेदवारांची घोषणा करेल त्यात काही राखीव जागांचाही समावेश असेल. एबीपी न्यूज यांनी सूत्रांच्या हवाल्यानं ही बातमी दिली आहे.

भाजपाची ही रणनीती पहिल्यांदाच नाही तर याआधीही असे प्रयोग भाजपाने केले आहेत. मागील वर्षी झालेल्या मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान निवडणुकीच्या घोषणेपूर्वी भाजपाने त्यांची उमेदवार यादी जाहीर केली होती. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात शिवसेना-भाजपा युतीला स्पष्ट बहुमत मिळालं होतं. परंतु मुख्यमंत्रिपदावरून झालेल्या वादानंतर उद्धव ठाकरेंनी वेगळी भूमिका घेत काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादी यांचं सरकार राज्यात बनवलं. 

दरम्यान, अडीच वर्षांनी उद्धव ठाकरे यांचे सरकार कोसळले. जून २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेतील ४० आमदारांनी पक्षापासून वेगळे होत भाजपासोबत सरकार बनवलं. त्यानंतर एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर २०२३ साली भाजपा-शिवसेना यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांना घेऊन अजित पवारही सत्तेत सहभागी झाले. महाराष्ट्रात भाजपा २०१९ साली १०५ जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष बनला होता. त्यावेळी शिवसेनेला ५६, राष्ट्रवादीला ५४ आणि काँग्रेसला ४४ जागा मिळाल्या होत्या. 

महायुतीत जागावाटपावरून वाद होणार?

महायुतीत सध्या भाजपा, एकनाथ शिंदेंच्या नेतृ्त्वाखालील शिवसेना, अजित पवारांच्या नेतृ्त्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश आहे. राज्यात एकूण २८८ जागा आहेत त्यातील ८०-९० जागांवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने दावा केला आहे तर किमान १०० जागा लढवण्यावर शिंदेंच्या शिवसेनेचा भर आहे. त्यात भाजपा मित्रपक्षाला एवढ्या जागा सोडणार का हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे महायुतीत जागावाटपावरून वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

Web Title: BJP first list of 30-40 candidates for maharashtra assembly elections will be announced soon? 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.