- विजय बाविस्कर, पिंपरी-चिंचवडराष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते अजित पवार संपूर्ण राज्यात विकासाचे मॉडेल म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिकेचे उदाहरण देत होते. परंतु, पिंपरी-चिंचवडच्या नागरिकांनीच हे मॉडेल नाकारले आहे. राष्ट्रवादीच्या बालेकिल्यात भाजपाने स्पष्ट बहुमत मिळविताना जनाधाराचे वेगळे उदाहरणही निर्माण केले. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे एकेकाळचे कट्टर समर्थक आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे व आझम पानसरे यांच्या प्रवेशामुळे भाजपाने ३ वरून थेट ७७ जागांवर जोरदार मुसंडी मारली. राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर असून, एकेकाळी महापालिकेतील प्रमुख सत्ताधारी काँग्रेसला भोपळाही फोडता आलेला नाही. गेल्या १० वर्षांपासून पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता होती. माजी मंत्री दिवंगत प्रा. रामकृष्ण मोरे यांच्या निधनानंतर अजित पवार यांनी पिंपरी महापालिकेत लक्ष घालण्यास सुरूवात केली. नव्याने वाढत असलेल्या या शहराचे नियोजन केले. प्रशस्त रस्ते, उड्डाणपुलापासून अनेक गोष्टी उभ्या केल्या. पिंपरीचे उदाहरण देत पुण्यातही एकहाती सत्ता द्या, असाच विकास करतो, असे ते सांगत. परंतु, हे सगळे करताना नागरिकांच्या मुलभूत गरजा पुर्ण होत नव्हत्या, हेच निकालावरुन दिसून आले.दिग्गजांचा पराभवमहाालिकेच्या १२८पैकी सर्वाधिक ७७ जागा भाजपाने जिंकल्या. त्यामध्ये राष्ट्रवादीतून गेलेले १५ नगरसेवक पुन्हा भाजपातून निवडून आले. आमदार महेश लांडगे यांनी भोसरीचा गड राखला तरी, त्यांचे भाऊ सचिन लांडगे पराभूत झाले. राष्ट्रवादी ८२ जागांवरून थेट ३६वर आली. त्यामध्ये राष्ट्रवादीच्या महापौर शकुंतला धराडे, उपमहापौर प्रभाकर वाघिरे, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर यांच्यासारख्या दिग्गजांचा पराभव झाला.
राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपाने रोवला झेंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2017 1:27 AM