मुंबई - विधानसभा निवडणुकीनंतर प्रदीर्घ काळ सुरू असलेला सत्ता स्थापनेचा पेच संपुष्टात आल्यानंतर आज विधानसभा अध्यक्ष आणि विरोधीपक्षनेत्यांची निवड करण्यात आली. विधानसभा अध्यक्षपदी काँग्रेस नेते नाना पटोले यांची निवड झाली. तर विरोधीपक्ष नेतेपदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाले. दोन्ही नेत्यांचे सभागृहातील नेत्यांकडून अभिनंदन करण्यात आले होते. जयंत पाटील यांनी विरोधीपक्षनेते फडणवीस यांचे तोंडभरून कौतुक करून अभिनंदन केले. यावेळी त्यांनी फडणवीसांना टोलाही लगावला.
भाजपमध्ये सध्या तरी देवेंद्र फडणवीस अत्यंत अभ्यासू आहेत. मी अर्थमंत्री असताना त्यांनी माझ्याकडून बजेट समजून घेतले होते. त्यानंतर त्यांनी त्यावर पुस्तक लिहिले. महापौर, युवा मोर्चाचे अध्यक्ष, प्रसिद्धीप्रमुख, मुख्यमंत्री अशा जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या. आता विरोधीपक्षनेते म्हणून ते भूमिका निभावणार आहेत. ही जबाबदारी ते चोख पार पाडतील, असं जयंत पाटील यांनी सांगितले.
जयंत पाटील पुढे म्हणाले की, नागपूर पश्चिममधून त्यांनी भाजपच्या प्रसिद्धप्रमुखाचे काम केले होते. त्याचा त्यांनी यथेच्छ फायदा केला. त्यांच्या प्रसिद्धीच्या अनुभवाचा फायदा भाजपला मागील पाच वर्षांत झाला. निवडणुकीच्या काळात पान-पान जाहिराती दिसायच्या, त्यावेळी वाटायच आपलं काही खर नाही. पण कस का होईना आम्ही सत्तेत आलो, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.
मागील सरकारने जाहिरातीवर मोठ्या प्रमाणात खर्च केला. आमच्या काळात पृथ्वीराज चव्हाण यांनी आम्हाला जाहिरातीवर अधिक खर्च करू नका, असं म्हटलं होतं. त्यामुळे आम्ही या प्रसिद्धीच्या भानगडीत पडलो नव्हतो, असंही पाटील यावेळी म्हणाले.