PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी वाराणसी मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीसाठी तिसऱ्यांदा आपला उमेदवारी अर्ज भरला. उमेदवारी अर्ज दाखल करताना राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे अनेक नेते पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान मोदींना जिरेटोप घालून त्यांचा सत्कार केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंही त्यांच्यासोबत उपस्थित होते. प्रफुल्ल पटेल यांनी मोदींना जिरेटोप घातल्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. विरोधी पक्षांनीही पंतप्रधान मोदींसह महायुतीच्या नेत्यांना लक्ष्य केलं आहे. यावर आता भाजपने स्पष्टीकरण दिलं आहे. पंतप्रधान मोदींनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्यांना शुभेच्छा देताना प्रफुल्ल पटेल यांनी त्यांच्या डोक्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख म्हणून असलेला जिरेटोप घातला. जिरेटोप घातल्याचे फोटो आणि व्हिडीओ समोर आल्यानंतर विरोधकांनी सत्ताधारी महायुतीला घेरलं आहे. शरदचंद्र पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस आणि संभाजी ब्रिगेडने प्रफुल्ल पटेल यांच्यावर निशाणा साधला आहे. व्हिडीओ व्हायरल होताच भाजप आणि शिंदे गटाने याबाबत स्पष्टीकरण दिलं.
पंतप्रधान मोदी हे छत्रपती नाहीत
"जिरेटोप हे हातात देऊन एखाद्या व्यक्तीचा सन्मान केला जातो, परंतु अजित पवार गटाचे प्रफुल पटेल यांनी महाराष्ट्राचं आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख असणारा जिरेटोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावर परिधान करून महाराजांचा अवमान केला आहे," अशी टीका शरद पवार गटाने केली. तर "छत्रपती शिवाजी महाराज यांच्याव्यतिरिक्त अन्य कोणीही जिरोटोप परिधान करु नये असा संकेत आहे. छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज यांचा अभिनय करतानाही संपूर्ण वेशभूषा परिधान केल्यावर जिरेटोप परिधान करण्याची पद्धत आहे. पंतप्रधान मोदी हे छत्रपती नाहीत. फक्त छत्रपतीच जिरेटोप परिधान करु शकतात. जिरेटोपाचा असा अपमान केला जाऊ नये," असं संभाजी ब्रिगेडने म्हटलं आहे.
भाजपने दिलं स्पष्टीकरण
छत्रपतींचा जिरेटोप प्रफुल्ल पटेल यांनी बेईमानांच्या डोक्यावर घातला, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली होती. त्यावर आता भाजप आणि शिंदे गटाने स्पष्टीकरण दिलं आहे. प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान मोदींना जिरेटोप घातला यात पंतप्रधानांचा दोष काय?, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. तर जिरेटोपावरुन राजकारण करु नये, ज्यांनी जिरोटोप घातला त्या पंतप्रधानांचा यात काय दोष? अशा प्रकारची पुनरावृत्ती होणार नाही, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.