- मिलिंद कुलकर्णी, जळगाव
भाजपाचे नेते, मंत्री, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी नकारात्मक प्रचाराला परिपक्वतेने तोंड देत जिद्दीने स्वबळावर जिल्हा परिषदेवर झेंडा फडकावला आहे. सलग १५ वर्षे सत्ता ताब्यात असूनही ‘अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर’चा परिणाम होऊ दिला नाही. शिवसेनेचे बळ ‘जैसे थे’ राहिले असून, काँग्रेस-राष्ट्रवादीचे संख्याबळ घटले आहे. एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन या भाजपाच्या दोन नेत्यांचे गट पक्षात आमने-सामने उभे ठाकलेले आहेत. विधान परिषद निवडणुकीत ही दरी अधिक रुंदावली. पालिका निवडणुकीत यश मिळाले असले तरी खरी कसोटी ग्रामीण भागात होती. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर जळगावच्या पालकमंत्रिपदाची धुरा सोपवून दोन्ही गटांना सोबत घेऊन निवडणुकीचे आव्हान पेलले. खडसे यांनी त्यांच्या मतदारसंघावर पूर्ण लक्ष केंद्रित केले होते. परिणामी, भाजपाच्या ३३ जागांपैकी या मतदारसंघात २२ जागा निवडून आल्या आहेत. खासदार ए.टी. पाटील यांच्या मतदारसंघात मात्र भाजपाची कामगिरी समाधानकारक नाही. १५पैकी ८ पंचायत समितीमध्ये कमळ फुलले तर सेनेला ४ समित्यांमध्ये यश मिळाले. पारोळ्याला केवळ एका म्हणजे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. सतीश पाटील यांच्या गावात राष्ट्रवादीला यश मिळाले. चाळीसगाव व चोपड्यात भाजपा व राष्ट्रवादीचे समसमान सदस्य आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ ४ने घटून १६वर आले आहे. विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी खासदार ईश्वरलाल जैन, माजी आमदार दिलीप वाघ, साहेबराव पाटील यांच्या गावांमध्ये पक्षाची कामगिरी बरी झाली आहे. मात्र माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार संतोष चौधरी यांच्या मतदारसंघात निराशा झाली. माजी आमदार राजीव देशमुख, संजय गरुड यांनी आपल्या तालुक्यांमध्ये लक्षणीय कामगिरी केली. माजी खासदार वसंतराव मोरे यांचे पुत्र आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रवींद्र पाटील यांच्या स्नुषेचा धक्कादायक पराभव झाला. शिवसेनेला गेल्या वेळेची १४ हीच संख्या गाठताना दमछाक झाली. तीन आमदारांपैकी गुलाबराव पाटील, किशोर पाटील यांच्या मतदारसंघात समाधानकारक कामगिरी झाली, मात्र आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या मतदारसंघात कामगिरी खालावली. पालिकेपाठोपाठ याही निवडणुकीत या ठिकाणी यश मिळालेले नाही. दोन्ही कॉँग्रेसला धक्काकाँग्रेसला या निवडणुकीत मोठा धक्का बसला. संख्याबळ ६ने घटून ४वर आले. भाजपाच्या काँग्रेसमुक्तीची घोषणापूर्ती ११ तालुक्यांमध्ये झाली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ ४ने घटून १६वर आले आहे.